महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात शस्त्रक्रिया

एनजीओमार्फत ८ – १० लाखांची मदत

शस्त्रक्रियेच्या थेट प्रक्षेपणामुळे ३० डॉक्टरांना मिळाले कौशल्याचे धडे

मुंबई: शेतकरी कुटुंबातील (फळ विक्रेता) जन्मतः कर्णबधीर असलेल्या चार वर्षीय मुलावर मुंबई महापालिकेच्या कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात डॉ. राजेश यादव यांच्या प्रयत्नाने, प्रख्यात कान-नाक-घसा तज्ज्ञ पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने (Dr Milind Kirtane) यांनी ८ जुलै रोजी यशस्वी शस्त्रक्रिया केली.

‘कॉक्लिअर इम्प्लान्ट’ ही शस्त्रक्रिया (Cochlear Implant surgery) कमी वयाच्या मूक-बधीर/ कर्णबधीर रुग्णांसाठी वरदान आहे. ‘कॉक्लिअर’ हे एक लहान स्वरुपाचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ते बसविल्यामुळे लहान मुलांमधील कर्णबधिरता दूर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते.

विशेष म्हणजे या मुलाच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉ.आंबेडकर रुग्णालयातील मानसेवी तज्ज्ञ डॉ. धोंड, नोबल फाऊंडेशन, डॉ.भरत जोबनपुत्रा व एड्स कॉम्बॅट यांनी मिळून आर्थिक पाठबळ उभे केले.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णालयातील कान-नाक-घसा शस्त्रक्रियागृहातून या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले होते. ज्याचा लाभ ३० डॉक्टरांनी घेतला. भविष्यात अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याच्या दृष्टीने कौशल्य आत्मसात करता यावे म्हणून ही प्रक्षेपणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती.

या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण केल्यामुळे ३० डॉक्टरांना शस्त्रक्रिया कौशल्याचे धडे मिळाले. या शस्त्रक्रियेनंतर या मुलाला चांगले ऐकायला येईल, असा आत्मविश्वास शस्त्रक्रिया करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

पालिकेच्या रुग्णालयात प्रथमच करण्यात आलेल्या अशा शस्त्रक्रियेसाठी, डॉ. नरेंद्र शर्मा, डॉ. संगमलाल पाल, डॉ. मृण्मयी यांनी सहाय्य केले. यावेळी, रुग्णालयातील मानसेवी तज्ज्ञ डॉ. धोंड आणि डॉ. ललित सेठ हे देखील यावेळी उपस्थित होते.

— आणि कर्णबधीर लहान मुलासाठी डॉ. आंबेडकर रूग्णालय व डॉक्टर बनले देवदूत

सध्या लहान मुलांना जन्मतः काही मोठे आजार उद्भवले तर पालक खचून जातात. आर्थिकदृष्ट्या गरीब एका शेतकरी कुटुंबातील फळविक्रेत्याचा चार वर्षाचा मुलगा जन्मत: मूक-बधीर असल्याचे एका वर्षापूर्वी संबंधित कुटुंबाच्या लक्षात आले. या बालकाच्या उपचारांकरीता त्याच्या आई-वडिलांनी खूप ठिकाणी प्रयत्न केले.

आर्थिकदृष्ट्या अडचणींमुळे मोठ्या रुग्णालयांत जाणे परवडत नसल्याने त्यांनी मुंबई महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारांकरीता या बालकाला आणले. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉ. राजेश यादव आदी डॉक्टरांनी, ‘कॉक्लिअर इम्प्लान्ट’ करण्याविषयी सुचविले.

मात्र, या शस्त्रक्रियेचा उपकरण व इतर खर्च देखील परवडणार नसल्याने या कुटुंबाने सांगितले. त्यांची एकूणच परिस्थिती लक्षात घेता आणि या लहानग्याला श्रवणशक्ती देण्याचा निर्धार करुन रुग्णालयातील मानसेवी तज्ज्ञ डॉ. धोंड, नोबल फाऊंडेशन, डॉ. भरत जोबनपुत्रा व एड्स कॉम्बॅट यांनी मिळून आर्थिक पाठबळ उभे केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here