नव हिंदूंचा समाचार घेणार – उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री यांचा विरोधकांना इशारा
भारतातील पहिल्या एनसीएमसी कार्डचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण
@maharashtracity
मुंबई: घंटाधारी, नव हिंदुत्ववादी लोकांनी आम्हा गदाधारी हिंदूंना हिंदुत्व शिकवू नये. बिन कामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना हनुमान चालिसा म्हणायचे असेल तर अतिथी म्हणून आदराने या. दादागिरी कराल, घुसायची बात कराल तर दादागिरी मोडीत काढू. लवकरच एक सभा घेऊन या नव हिंदू, तकलादू हिंदूंचा समाचार घेणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी, मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray), भाजप (BJP) व राणा दाम्पत्यांचे नाव न घेता दिला आहे.
भारतातील पहिल्या एनसीएमसी कार्डचा (NCMC card) लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा येथील मुख्य कार्यालयात पार पडला.
यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), परिवहन मंत्री अनिल परब, खा.अरविंद सावंत, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईसह राज्यात सध्या हनुमान चालिसा, भोंगा, हिंदुत्व यावरून मनसेचे नेते राज ठाकरे, भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि इतर नेते, खा. नवनीत राणा (MP Navneet Rana) व आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्याकडून शिवसेना (Shiv Sena) व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार आरोप, प्रत्यारोप, टीका करण्यात येत आहेत. मात्र एवढे दिवस तारतम्याने वागणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी बेस्ट उपक्रमाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विरोधकांवर चांगलीच ‘तोफ डागली व गदा प्रहार’ केला. मुख्यमंत्री यांचा रौद्रअवतार आणि दादागिरी मोडीत काढण्याची भाषा व इशारा पाहून एक क्षण उप मुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा चपापले.
—- तर दादागिरी मोडीत काढणार
खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीमध्ये येऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचून दाखविण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आणि त्यावरून मोठे राजकारण घडले. राणा दाम्पत्यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आपला खाक्या दाखवला व अखेर न्यायालयीन आदेशाने तुरुंगात रवानगी झाली. या सर्व घडामोडीनंतरही चिडीचूप बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, हनुमान चालिसा वाचायचा असेल तर हिंदू संस्कृतीनुसार आदराने घरात या, पण घरात घुसण्याची भाषा कराल तर तुमची दादागिरी मोडीत काढू, असा इशारा राणा दाम्पत्यांचे नाव न घेता दिला.
बिनकामाच्या भोंग्याना काडीची किंमत नाही
मुंबईसह राज्यात सध्या भोंग्यावरून वेगळेच राजकारण सुरू आहे. त्याचा समाचार घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, जे बिनकामाच्या भोंगे वाजवतात, त्यांना काडीची किंमत देत नाही. आम्ही जे करतो ते बेस्टच करतो. मात्र ज्यांच्या पोटात ऍसिडिटी झालीय, मळमळते आहे, जळजळते आहे त्यांनी त्यांच्या राज्यात काय कामे केली ? असा सवाल उपस्थित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
नवहिंदूंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये
आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणता, अरे हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का घातलं आणि सोडलं. आमचे हिंदुत्व हे तसे तकलादू नाही. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा तुम्ही कुठल्या बिळात लपून बसला होतात ? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपचे नाव न घेता केला. नवहिंदूंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी, देवळात घंटा बडविणारा हिंदू नको, अतिरेक्यांना बडविणारा हिंदु पाहिजे, असे म्हटले आहे. त्यामुळे केवळ घंटाधारी हिंदूंनी आम्हा गदाधारी हिंदूंना हिंदुत्व शकवू नये, या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले.
हनुमान चालिसा तुमच्या घरात वाचा ना -: उप मुख्यमंत्री
मुंबईसह भारतात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. सण उत्सव मिळून मिसळून साजरे करतात. असे असताना तुम्हाला हनुमान चालिसा वाचायचा असेल तर तुम्हाला तुमचे घर नाही का ? तिकडेच (मातोश्री) जाऊन तो का वाचायचा ? तुमच्या घरात जाऊन वाचा ना? चांगले वातावरण असताना ते बिघडविण्याचे आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात का आणताय ? अशा परखड शब्दांत उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी राणा दाम्पत्याचे नाव न घेता समाचार घेतला.
यावेळी, राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी, बेस्ट उपक्रमातील आधुनिक व डिजिटल सेवांची माहिती दिली. आणखीन चांगल्या व आधुनिक सेवासुविधा मुंबईकरांसाठी उपलब्ध करणारं असल्याचे सांगितले.