‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ’आपला दवाखाना‘चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
@maharashtracity
मुंबई: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ’आपला दवाखाना‘ योजना ठाण्यात प्रथम राबविण्यात आली असून ठाण्यात ५० ‘आपला दवाखाने’ सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ते आरोग्य मंत्री असताना ही योजना राबविण्यात आली होती. नंतर ते नगरविकास मंत्री अणि आता मुख्यमंत्री झाल्याने हीच योजना आता राज्यभर राबविण्यात येणार आहे.
‘आपला दवाखाना’ (Apala Dawakhana) संकल्पना मुंबईत सुरु करण्याची आयुक्तांसोबत चर्चा झाली. अशा संकल्पनांतून सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असल्याने पालिकेच्या २२७ वॉर्ड हे दवाखाने सुरु करण्याची कारवाही सुरु झाली. आजपासून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (Balasaheb Thackeray Apala Dawakhana) योजनेचा शुभारंभ सुरु झाला असून प्रत्येक वॉर्डात असे दवाखाने दिसतील. ही योजना सर्वसामान्यांना संजीवनी ठरणार आहे. तसेच राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यभर ७०० दवाखाने उघडण्याची संकल्पनाही राबविण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी मुंबईत दिली.
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील धारावी परिसरात करण्यात आले. यावेळी शिंदे बोलत होते. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे उद्घाटन त्यांच्या स्मृती दिनी सुरु झाल्याने आनंद होत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे अशी बाळासाहेबांची अपेक्षा होती. सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा मिळणे अशी बाळासोबांची अपेक्षा असल्याने आपला दवाखाना सुरु होत आहेत. यावेळी राज्यात कोविड पसरलेल्या स्थितीची पूर्वपिठीका सांगत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार आणि पालिकेतील कर्मचाऱ्यांचे कौतुक शिंदे यांनी यावेळी केले.
शिंदे म्हणाले की, कोविड काळात एमएमआरडीए (MMRDA) आपल्याकडे असल्याने एमएमआरडीएकडून कोविड काळात पहिले कोविड सेंटर बीकेसीमध्ये (BKC Covid Centre) सुरु करण्यात आले. त्यानंतर मुंबईतील कोविड सेंटर सुरु झाली. कोविड अनपेक्षित संकट हेते. कोणालाच मार्ग सुचत नव्हता. तरीही एमएमआरडीए, एमएसआरडीए, सिडको, म्हाडा आणि मुंबई महानगरपालिका आदी सर्व संस्थांनी एकत्र येऊन गरजेनुसार कोविड सेंटर उभारली. त्यातही उपकरणे, आयसीयू, औषधे आदी सोयी उपलब्ध करुन चहल यांनी कशाचा तुटवडा भासू दिला नाही.
तसेच मुंबई शेजारील ठाण्यात (Thane) देखील कोविड उपचार संबंधित तुटवडा भासल्यास मुंबई महानगर पालिकेने मदत केली असल्याचे गौरवाद्गार शिंदे यांनी काढले. यावेळी पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री दीपक केसरकर, खा. राहुल शेवाळे तसेच उपचाराधीन रुग्ण उपस्थित होते.
आपला दवाखाना सारख्या योजनेत असलेल्या प्राथमिक केंद्रातच रुग्णाला उपचार किंवा निदान मिळाल्यास आपला दवाखाना संजीवनी ठरणार आहे. रुग्णांच्या बोलण्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंटेनर वापरुन आपला दवाखाना सुरु करण्यात आला असून दवाखान्यात सर्व चाचण्या सुविधा मिळणार आहेत. आपला दवाखाना यात १४७ चाचण्या मोफत होणार असून एमआरआय सारख्या महागड्या तपासण्या मोफत होणार आहेत. तसेच वॉर्ड निहाय या सुविधा मिळणार आहेत. एकट्या धारावीतील २० ते २५ हजार लोकवस्तीला एक आपला दवाखाना असे १५ दवाखाने होणार आहेत.
मुंबई होणार समृद्ध
एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले की, धारावीच्या पुनर्विकासातील (Dharavi redevelopment) अडथळे दूर करुन धारावीचा विकास होणार आहे. राज्य सरकारने त्याला गती देण्याचे काम सुरु केले आहे. याचे लवकरच परिणाम दिसतील. मुंबईतील खड्ड्यांवर उपाय योजना म्हणून दोन हजार किमी लांबीचे रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरु केले असून यातील एक हजार किमी रस्ते काँक्रिटीकरण बाकी असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.
ते म्हणाले की, उर्वरित रस्त्यांचे आगामी दोन अडीच वर्षात काम पूर्ण होईल. मुंबईच्या सुशोभीकरणाचे काम होणार आहे. मुंबई स्वच्छ समृद्ध आरोग्य शहर करावयाचे सरकारचे उद्देश असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यातील २२५ प्रकल्पासाठी २ लाख कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती देखील शिंदे यांनी यावेळी दिली.