मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
By Anant Nalawade
Twitter: @nalawadeanant
मुंबई: ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे ठाणे आणि पालघर जिल्हयातील गोरगरीबांना फायदा होणार आहे. अनेक कुटुंबांचे जीव वाचवले जाणार आहेत. ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालय सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य, महिला व बाल अणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या ९०० खाटांच्या नुतन इमारत बांधकामाच्या भुमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना त्यांनी सुरुवातीला या ऐतिहासिक दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, धर्मवीर आनंद दिघे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे एक वेगळे नाते जोडले गेले होते. दिघे साहेबांच्या काळात जिल्हा रुग्णालयात विविध ठिकाणांहून आलेल्या रुग्णाबद्दल दिघे साहेबांना माहिती मिळताच, आलेल्या प्रत्येक रुग्णाची दिघे साहेब स्वत: प्रत्यक्ष येऊन विचारपूस करत असत. त्यांना काही अडचणी असल्या तर ते त्याचवेळी त्या अडचणींचे निरासन करत. त्यामुळे या रुग्णालयाचे नुतनीकरण करणे, अत्याधुनिक करण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. कोराना काळात या रुग्णालयाने महत्वाची भुमिका बजावली आहे. या रुग्णालयामुळे कोरोना महामारीत लाखो लोकांचे जीव वाचले, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.
सर्व अडचणींवर मात करुन अत्याधुनिक सेवासुविधा असलेले रुग्णालय ठाणेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. या नवीन इमारतीच्या बांधकामाचे काम पाहणाऱ्या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी विहित मुदतीच्या आत दर्जेदार इमारत तयार करुन देण्याच्या सुचनाही यावेळी दिल्या.