uddhav

मुख्यमंत्री यांचे आदेश

@maharashtracity

मुंबई: येत्या पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुंबईतील सर्व डेब्रिज (debris) हटविणे, रस्त्यांची कामे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आणि नालेसफाईची (nullah cleaning) कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यात यावीत, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बुधवारी पालिका प्रशासनाला दिले.

पावसाळ्यात मुंबईत पावसाचे पाणी साचून पूरस्थिती (flood like situation) निर्माण होऊन त्याचा रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner IS Chahal) व मुंबईतील इतर प्राधिकरणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची ‘वर्षा’ निवासस्थानी एक बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री यांनी वरीलप्रमाणे संबंधित यंत्रणांना आदेश दिले.

या बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (IAS Manukumar Srivastava), पालिका आयुक्त इकबाल चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे (IAS Sitaram Kunte), मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त श्रीनिवासन, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मुंबई मंडळाचे महाव्यवस्थापक शलभ गोयल, पश्चिम रेल्वेचे जीव्हीएल सत्यकुमार, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्यासह महानगरपालिका, एमएमआरडीए, पोलीस, नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी, मुंबईत पावसाळापूर्व कामांसाठी (pre monsoon work) विविध विभागांनी केलेल्या नियोजनाचे आणि सुरु असलेल्या कामांचे महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल यांनी सादरीकरण केले.

पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामांना गती द्यावी

मुंबईत पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेप्रमाणेच (BMC), एमएमआरडीए (MMRDA), रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, म्हाडा (Mhada), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), मुंबई पोर्ट ट्रस्ट (MBpT) आणि पोलीस या विविध विभागांनी पावसाळ्यापूर्वी करावयाच्या आवश्यक कामांना गती द्यावी. मुंबईतील ४५० ठिकाणी निर्माण होणारे डेब्रिज ३१ मे पर्यंत हटविण्याची कार्यवाही एमएमआरडीए व मुंबई महापालिकेने करावी, असे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

रस्ते, रेल्वे मार्गातील कलव्हर्ट सफाई, मेट्रोची कामे पूर्ण करणे

पावसाळा सुरू होण्यास आता फक्त २ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हे पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गातील नालेसफाईची व कलव्हर्टची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच, मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रो रेल्वेची कामे सुरू आहेत. कांदिवली भागात मेट्रोची जी कामे सुरु आहेत, त्याठिकाणी अर्धवट राहिलेल्या कामांना पूर्ण करण्यात यावे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गामधील ४७ कल्व्हर्ट, मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गातील रेल्वे ट्रॅकखालील ४० कल्व्हर्ट यांची वेळेत साफसफाई करण्यात यावी, असे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएमआरडीए व रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यावर विशेष भर द्यावा. ज्या भागांमध्ये मेट्रोसह इतर सार्वजनिक कामे सुरु असतील त्या भागात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेणे. तसेच, डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित कंत्राटदारांकडून कामे करवून घ्यावीत, असे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

संभाव्य वादळ, अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता उंच इमारतींवर बांधकामासाठी लावण्यात आलेल्या क्रेन्समुळे दुर्घटना घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी संबंधित विकासकांना सूचना देणे. अतिवृष्टीच्या काळात किनारपट्टी भाग, कोळीवाड्यातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची वेळ आल्यास त्यासाठी अगोदरच सुविधा उपलब्ध करुन ठेवण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here