दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांचा पुढाकार

@maharashtracity

मुंबई: शिक्षणक्षेत्र हे केवळ विद्यार्थ्यांची फॅक्टरी न बनता आपला देश शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रस्थानी राहण्याच्या दिशेने शासन प्रयत्न करीत असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले. यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. 

शैक्षणिक परिषदेत बोलतांना मंत्री केसरकर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेतील नवीन शैक्षणिक धोरण भविष्यकाळातील एक सुवर्ण संधी आहे. मातृभाषेतून दिले गेलेले शिक्षण अधिक परिणामकारक ठरते यादृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणात विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात एक लाखांपेक्षा अधिक शाळा असून ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्येही शिक्षणाची सोय सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांमध्ये सरावासाठी कोरी पाने जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांवर अधिक भर दिला जात असून, कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणासाठी एचसीएल (HCL), टीआयएसएस (TISS) या संस्थांसोबत करार करण्यात आला असल्याची माहिती मंत्री केसरकर यांनी दिली. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात नव्हती, तथापि त्यांनी किती ज्ञान आत्मसात केले याचे विश्लेषण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. यामुळे प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना मातृभाषेचे महत्त्व पटवून सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिक्षण क्षेत्रातील संस्थांच्या प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणी शिक्षणमंत्री केसरकर यांनी यावेळी जाणून घेतल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना घडविण्याच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या विविध व्यक्ती आणि संस्थांचा त्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here