भाजप आमदार योगेश सागर यांचा मनपा आयुक्तांना इशारा

@maharashtracity

मुंबई: मुंबई शहर उपनगरात समान पाणी वाटप संदर्भात मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (BMC Commissioner IS Chahal) यांनी स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता बैठक घेतल्याने भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार टीका केली आहे. केवळ सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना खुश करण्यासाठी बैठक घेऊ नका, असा इशारा भाजप आमदार योगेश सागर (BJP MLA Yogesh Sagar) यांनी आयुक्तांना दिला आहे.

या संदर्भात सागर यांनी आयुक्त यांना लेखी पत्र दिले आहे. या पत्रात आमदार सागर यांनी नमूद केले आहे की, “मी सन २००० मध्ये नगरसेवक असल्यापासून सातत्याने मुंबई शहर व उपनगर येथील लोकसंख्या घनता आधारे पाण्याचे समान वाटप व्हावे यासाठी महानगरपालिका सभागृहात, स्थायी समितीच्या बैठकीत तसेच सन २००९ मध्ये आमदार झाल्यापासून विधानसभेत या गोष्टीचा सतत पाठपुरावा करीत आहे.”

ते पुढे लिहितात, “माझ्या लक्षात असे आणून देण्यात आले आहे की आपण महानगरपालिका प्रशासक या नात्याने पर्यावरणमंत्री व मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या समवेत समान पाणी वाटपासाठी बैठक घेणार आहात.”

आमदार सागर म्हणतात की, मुंबई महानगरपालिकेमध्ये आजही पाणी खात्यात या संदर्भात काही विषय असल्यास तेथील अधिकारी सागर यांच्याशी माहितीची देवाण-घेवाण करीत असतात.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काळात समान पाणी वाटपाबाबत महानगरपालिकेच्या तज्ञ समिती समोर आमदार सागर यांनी त्यांचे मत मांडले होते. या समितीने तसा अहवाल महाराष्ट्र शासन व मुंबई महानगरपालिकेला दिला होता, याकडे भाजप नेत्याने पत्राद्वारे आयुक्त यांचे लक्ष वेधले आहे.

सागर लिहितात की त्यांच्या असे लक्षात आले आहे की महानगरपालिका प्रशासक म्हणून सत्ताधारी मंत्र्यांना खुश करण्यासाठी आयुक्त बैठक बोलवित आहात. याबाबत तोडगा काढण्यासाठी मुंबई शहर व उपनगरातील सर्व आमदारांना या बैठकीत बोलवावे, अशी अपेक्षा व्यक्त करून सागर लिहितात की अन्यथा सत्ताधारी मंत्र्यांना खुश करण्याचा हा प्रशासनाचा डाव राहिल आणि तो मुंबईसाठी उपयोगाचा ठरणार नाही.

महानगरपालिका आयुक्त व प्रशासक या नात्याने आपल्या सुचनांवर विचार करून मुंबई शहर व उपनगरातील सर्व मंत्री व आमदारांना या बैठकीस निमंत्रित करावे, अशी अपेक्षा आमदार योगेश सागर यांनी व्यक्त केली आहे. असे केले तरच बैठक परिणामकारक होऊन मुंबई शहर व उपनगर यांना समान पाणी वाटपाबाबत (Equal distribution of drinking water) निश्चित तोडगा काढता येईल, असेही सागर यांनी पत्रात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here