@maharashtracity
भाजप आ राम सातपुते यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका
मुंबई: अमरावती जिल्ह्यात दलित कुटुंबावर पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते (BJP MLA Ram Satpute) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
सातपुते म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावानं मत मागून, इथल्या वंचीत शोषित घटकांच्या भावनांचा खेळ करत सत्ता उपभोगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने (MVA government) आज दलितांवर पाण्यासाठी पुन्हा सत्याग्रह (Satyagraha) करण्याची वेळ आणलीये.
अमरावतीच्या (Amravati) सावंगी मग्रापुर गावातल्या दलित (Dalit) बहूल वॉर्डात महिनाभरापासून पाणी नाही. गावातील सरपंचांनी हेतूपूरस्पर पाण्याचे कनेक्शन तोडले आहेत. जीवघेण्या थंडीत आमच्या आई – बहिणी गावच्या वेशीवर ठिय्या बसल्या होत्या. अनेकांनी गाव सोडून दिलंय, याकडे सातपुते यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
हा फक्त पाण्याचा पुरता विषय नाही. हा सरळ सरळ तुम्ही सामाजिक बहिष्कार घालत आहात. हा मोठा गुन्हा आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेनी (Dhananjay Munde) या प्रकरणाची दखल घेत समिती स्थापन करून तातडीने चौकशीचे आदेश दिले पाहिजेत, अशी मागणी सातपुते यांनी केली.
वंचित घटकाच्या कल्याणासाठी उभारलेली बार्टी (BARTI) संस्थाही लाभ देण्यासाठी सावकारसारखं वागते, बील काढण्यासाठी तुम्हाला पार्ट्या द्यावा लागतात, असा आरोप करून सातपुते म्हणाले, या संस्था म्हणजे आपल्या जहागिऱ्या नाहीत याचे भान ठेवा. हा भोंगळ प्रकार कुणाच्या आशिर्वादानं सुरू आहे? असा प्रश्न त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना विचारला आहे.
आघाडीची सत्ता आली की दलित, वंचित, शोषित घटकावर अत्याचार वाढतात, असा आरोप करून राम सातपुते यांनी लवकरात लवकर संबंधित सरपंच, उपसरपंचावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.