@maharashtra.city
हिंगोली: भारत जोडो यात्रेने ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून प्रवेश केल्यानंतर मागील सहा दिवस गावा- गावातून या पदयात्रेला प्रतिसाद वाढत आहे. रविवारच्या विश्रांतीनंतर पदयात्रा कळमनुरीतील वस्पनगारा फाटा येथून सकाळी जोश व उत्साहात निघाली. सांगली जिल्ह्यातुन आलेल्या हजारो लोकांच्या साक्षीने सोमवारी सकाळी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Padyatra) निघाली. यात्रेचे बोधचिन्ह मुद्रीत केलेले सफेद टी शर्ट आणि सफेद टोपी घातलेल्या १२ हजार सांगलीकरांच्या (Sangli) उत्स्फूर्त गर्दीने रस्ता फुलून गेला होता. माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी पलूस- कडेगाव परिसरातील या कार्यकर्त्यांना भारत जोडो यात्रेत सहभागी केले होते.
महाराष्ट्रात (Maharashtra) यात्रा दाखल झाल्यानंतर देगलूरपासून सांगलीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात्रेत आहेत. आज त्यात पुन्हा भर पडली. त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीतील पंडीत नेहरूंचे (Jawaharlal Nehru) योगदान दर्शविणारे फोटो प्रदर्शन काही ठिकाणी भरली होती. नेहरूंची सातत्याने बदनामी भाजपकडून (BJP) करण्यात येते, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहरू कुटुंबियांचे देशासाठी योगदान त्यातून दाखवले असल्याचे आयोजकांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी भव्यदिव्य रांगोळीत (Rangoli of Rahul Gandhi) त्यांची प्रतिमा साकारण्यात आली होती. त्यासाठी राहुल स्वामी या कलावंताने 48 तास मेहनत केल्याचे सांगितले. इतर अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठया रांगोळ्या काढल्या होत्या. कुठे रस्त्यावर गुलाबाच्या फुलांची उधळण होती. तर कुठे लहान मुले गुलाबाची फुले आणि तिरंगी झेंडे हातात घेऊन स्वागतासाठी उभी होती, अशा प्रचंड उत्साहाच्या वातावरणात बालदिनी भारतयात्रींचे जंगी स्वागत हिंगोलीमध्ये (Hingoli) झाले.
पंडित नेहरू यांची प्रतिमा पुजन करून जागोजागी आदरांजली वाहण्यात आली होती. सत्र न्यायालय परिसरात तीन वर्षाची प्रदक्षिणा ही लहानगी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी आपल्या सवंगड्यासह उभी होती. तर सर्वधर्म समभावचा संदेश देण्यासाठी हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई धर्माच्या वेशभूषा लहान मुलांनी परिधान केल्या होत्या.
शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) काळात गावोगावी फिरुन शत्रूची माहिती आमच्या कलांच्या माध्यमातून जमा करून राजापर्यंत पोहोचत होतो. पण आता आम्हाला भिक्षा मागून जगावे लागत आहे. आम्हाला राहायला घरे, दारे, शेती, पेंशन मिळावी, या मागणीसाठी वासुदेव आणि गोंधळी पारंपरिक वेशभूषेत राहुजींना भेटण्यासाठी आले होते.
जुनी पेन्शन पूर्ववत लागू झाली पाहिजे, यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सामील झाले होते. तर पुण्यातून आलेल्या डॉक्टर दिलीप लांडे यांनी दोन क्विंटल फुले रस्त्यावर अंथरली होती. राहुल गांधी समाज जोडण्याचे काम करत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज पंडित नेहरूंच्या जयंतीनिमित्त गुलाबांच्या फुलांनी यात्रेकरूंचे स्वागत करत असल्याचे त्यांनी सांगितले.