@maharashtracity

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड टास्क फोर्सचा इशारा

मुंबई: लोकल प्रवास सवलतीपासून महिनाभराचा काळ निरीक्षणाचा सुरु झाला असून कोरोना प्रतिबंधक वर्तणुकीची टाळाटाळ केल्यास तिसरी लाटेची शक्यता असल्याचे राज्य कोरोना टास्क फोर्स (Task Force) सदस्य डॉ. अविनाश सुपे (Dr Avinash Supe) यांनी स्पष्ट केले.

महिनाभराच्या कालावधीतच सणउत्सव (festive season) सुरु झाल्याने कोरोना (corona) अद्याप गेला नसल्याची आठवण सतत करून देण्यात येत आहे.

तर दोन डोस घेतलेल्याना देण्यात आलेली लोकल प्रवास (local travel) सवलत ही नोकरी व्यवसायाकडे पाहून देण्यात आली असून उगीचच फिरण्यातून संसर्ग लाटेत रूपांतरित होऊ शकतो, असा इशाराही टास्क फोर्सने दिला आहे.

रविवारच्या नारळी पूर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या दिवशी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आली. रस्त्यावर वाढलेली गर्दी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी आमंत्रण ठरण्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली.

कोणत्याही सवलतीनंतर १५ ते २१ दिवसांचा कालावधी हा संसर्गाच्या दृष्टीने निरीक्षणाचा असतो. त्यामुळे किमान महिनाभर तरी सर्वांनी संयम बाळगणे महत्वाचे असल्याचे मत कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुपे यांनी व्यक्त केले.

शिवाय राज्यात अद्याप सातारा (Satara), सांगली (Sangli), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्गसारख्या (Sindhudurg) काही जिल्ह्यात रूग्ण आढळत येत असल्याने गणेशोत्सव दरम्यान नागरिकांचा प्रवास झाल्यास परीक्षा ठरणार आहे.

त्यामुळे सणासुदीच्या काळात गर्दी टाळणे प्रत्येकाची जबाबदारी असून गर्दीच्या ठिकाणी जाताना किंवा आल्यावर विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here