धुळ्यातील जैन दाम्पत्य भारावले
@masole_santosh
धुळे: बँकेत पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना येणारा कटू अनुभव आणि होणारा मनस्ताप आठवला तरीही, नको तो बँकेचा व्यवहार अन् नको ती बँक, अशा संतप्त प्रतिक्रीया ग्राहकांसह सर्वसामान्यांमधून उमटतात. पण, याउलट एक्सिस बँकेच्या प्रामाणिकपणाचा आणि कर्तव्यतत्परतेचा गोड अनुभव धुळे शहरातील एका ग्राहकाला आला आहे.
बँकेतील शिल्लक 25 पैशांची रक्कम चक्क डी.डी.च्या (मागणी धनाकर्ष) माध्यमातून संबंधित ग्राहकाला मिळाल्याने बँकेच्या या व्यवहारामुळे हा ग्राहक व त्यांची पत्नी अतिशय भारावले आहेत. विशेष म्हणजे चलनातून बाद झालेले 25 पैसे परत करण्यासाठी बँकेने तब्बल 60 रुपये खर्च केले.
इतकी तत्परता आणि प्रामाणिकपणा कथीत घोटाळेबाज बँकांनी दाखविला असता तर ग्राहकांचा बँकांवरील विश्वास अधिक दृढ झाला असता, अशा प्रतिक्रीया या घटनेच्या निमीत्ताने उमटत आहेत.
कुठलाही ग्राहक आपली रक्कम बँकेत ठेऊन व्यवहार करीत असतो. तेथे ही रक्कम सुरक्षीत असून ती आपणास अडीअडचणीच्या वेळेस कामात येईल, असाच ग्राहकांचा मानस असतो. परंतू, एरवी डिजिटल बॅँकींगमुळे (Digital banking) काही बँकांमधील घोटाळे (scam), ऑनलाईन फसवणूक (online fraud), एटीएमची अदलाबदल या प्रकारांमुळे अनेक ग्राहकांचा बँकांवरील विश्वास उडत चालला आहे.
हे कमी म्हणून की काय, बँकेतील अधिकार्यांसह तेथील कर्मचार्यांचा ग्राहकांसोबत अरेरावीने बोलण्याचा, खडूसपणे वागण्याचा अनुभव कटूच असतो. यामुळे बँकेत जाण्यासाठी अनेकजण नापसंती दर्शवितात. या उलट धुळे शहरातील वृत्तपत्र विक्रेते शिरीष मन्नालाल जैन यांना बँकींग व्यवहाराचा सुखद अनुभव आला आहे.
झाले असे, जैन यांचे शहरातील ऍक्सिस या खाजगी बँकेत खाते होते. त्यांनी अपरिहार्य कारणास्तव ते बँक खाते बंद करण्याचा निर्णय घेतला. बॅकेनेही जैन यांना त्यांचे खात्यातील दोन हजार 360 रुपये 25 पैसे काढण्यासाठी सांगितले. यानंतर जैन यांनी दोन हजार 360 रुपये बँकेतून काढून चलनातून बाद झालेले 25 पैसे तसेच शिल्लक ठेवले.
त्यानंतर त्यांनी धनादेश पुस्तिका (cheque book) एटीएम कार्ड बॅकेंत जमा केले. आठ दिवसांनी जैन यांना खाते बंद झाल्याचा बॅकेतून संदेश आला.
परंतू, त्यानंतर 15 दिवसांनी जैन यांना टपालाद्वारे एक पत्र आले. त्यात 25 पैशांचा डी.डी. होता. तसेच आपले 25 पैसे बँकेतून घेऊन जावे, असे त्यात बँकेने म्हटले होते. यामुळे आम्ही शुक्रवारी बँकेत जाऊन 25 पैसे घेतले. चलनातून बाद झालेले 25 पैसे आम्हाला मिळाले. शिवाय, या 25 पैशांसाठी बँकेने टपालासाठी 60 रुपये खर्च केला. परिणामी, बँकेच्या या व्यवहारी आणि चांगल्या वागणुकीमुळे जैन दांपत्य पुरते भारावले आहेत.
“बँकेत व्यवहार करताना अनेक कटू अनुभव येतात. पण, या बँकेने अतिशय प्रामाणिक आणि पारदर्शीपणा दाखविला आहे. चलनातून बाद झालेले माझे 25 पैसे देण्यासाठी बँकेने डी.डी.पाठवून 60 रुपये खर्च केले. हा अनुभव आमच्यासाठी अतिशय थक्क करणारा आणि सुखावणारा होता.”
-शिरीष जैन, बँक ग्राहक, धुळे.