परिचारिका बदली आदेशामुळे परिचारिका संतप्त

Twitter : @maharashtracity

मुंबई: सोलापूर येथील परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा मनिषा शिंदे यांची बदली करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाने काढले आहेत. ही बदलीच नियबाह्य असल्याचा आरोप करत ही बदली मागे घेण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारी रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केली आहे. तसे न केल्यास २६ नोव्हेंबरपासून तीन दिवस काळी फीत आंदोलन तसेच २९ नोव्हेंबर रोजी पूर्णवेळ काम बंद आंदोलन तर ३० नोव्हेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन (statewide strike) व निदर्शने करण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यता आला आहे. 

याचा रुग्णसेवेवर विपरीत परिणाम झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे संघटनेच्या उपाध्यक्ष हेमलता गजबे यांनी सांगितले. राज्यातील काही सरकारी रुग्णालयांत आज शुक्रवारी परिचारिकांनी काही तास बदलीविरोधात घोषणाबाजी केली. परिचारिका संघटनेच्या (association of Nurses) तक्रारीनुसार, पुण्यातील ससून रुग्णालय तसेच सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात अधिसेविकांविरोधात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे वारंवार तक्रारी करत आहेत. मात्र या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात नसल्याची संघटनेची तक्रार आहे.  

संघटनेच्या अधिकाऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जातो. सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात अधिसेविकांवर मनुष्यवधाचा आरोप आहे. या अधिसेविकेने परिचारिका संघनेच्या माजी अध्यक्षा आरीफा शेख यांची खोटी तक्रार केली. त्यांची बदली केल्यानंतर बेकायदेशीर निलंबनही करण्यात आले होते, असाही आरोप महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केला आहे. आता संघटनेच्या अध्यक्षा मनिषा शिंदे यांची बदली होत असल्याबाबत संघटनेचा आक्षेप आहे. 

शुक्रवारच्या परिचारिकांच्या आंदोलनाची पूर्वकल्पना आम्हांला संघटनेकडून देण्यात आलेली नाही. याबाबत अधिक माहिती घेऊन बोलू.”

– दिलीप म्हैसकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालय

आम्ही आंदोलनाची पूर्वकल्पना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाला दिली आहे. बदलीचे आदेश त्यांनी दिलेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालय खोटे बोलत आहे.”

– मनिषा शिंदे, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here