कोविडच्या पार्श्वभूमीवर सज्जतेची रंगीत तालीम
Twitter : @maharashtracity
मुंबई: राज्य सरकारचे जे जे रुग्णालय परिसर… रों… रों… करत रुग्णवाहिका आत शिरते….. पीपीई किट घातलेले आरोग्य कर्मचारी तयार असतात… रुग्णाला… रुग्णवाहिकेतून उतरवून व्हिलचेअरवर घेतात. नोंदणी कक्षात नेऊन नाव नोंदणी झाल्यावर स्वॅब टेस्टींग कक्षात घेऊन जातात. तो पर्यंत रुग्णांची शारिरिक स्थिती नाजूक होत जात असते… हे सर्व सोमवारी जे जे रुग्णालय परिसरात घडत असते. मात्र हे आरोग्य सेवांचे मॉकड्रिल असते (mock drill executed at hospitals). आरोग्य सेवा कितपत सज्ज आहेत याची हि रंगीत तालीम होती.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी राज्यांच्या आरोग्य यंत्रणांना कोविडच्या (Covid -19) पार्श्वभूमीवर सज्जतेच्या सुचना दिल्या. यात मॉकड्रिल घेण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे मुंबईतील सरकारी रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल घेण्यास सुरुवात झाली आहे. याअनुषंगांने राज्य सरकारच्या जेजे रुग्णालय (J J Hospital), सेंट जॉर्ज रुग्णालयात (Saint George Hospital) तसेच पालिकेच्या सायन रुग्णालयात मॉकड्रिल घेण्यात आले.
या मॉकड्रिल मध्ये रुग्णांना उपचार कसे द्यावेत, कोविडच रुग्ण कोणत्या स्थितीत आहेत हे कसे ओळखावे, डॉक्टरांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, पीपीई किट कसे वापरावे, यासह गंभीर रुग्णांना तातडीच्या उपचार देण्यासाठी कशी यंत्रणा राबवावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
वाढत्या कोरोना धोक्यामुळे आरोग्य यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी राज्यांच्या सचिवांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुन्हा एकदा एकत्र येऊन कोविड विरोधात लढा द्यायचा असल्याचे आवाहन केले. दरम्यान, दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गृहीत धरून सुरक्षा सुविधांची तपासणी करण्यासाठी मॉक ड्रील केले जाते. त्याचधर्तीवर आरोग्य यंत्रणा कितपत सजग आहे याचे मुल्यमापन या मॉकड्रिलमधून करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत आहेत. मात्र कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण नगण्य असले तरी रुग्णसंख्येचा विचार करून रुग्णालयांना पुढील स्थितीसाठी तयार रहायला हवे. श्वसनाचा गंभीर त्रास असलेल्या व्यक्तींची कोविड चाचणी वेळीच केली पाहिजे. जेणेकरून कोणत्या विभागांमध्ये कोविड रुग्ण आहेत याचा अंदाज घेता येईल आणि चाचण्या वाढवता येतील.
सर्व रुग्णालयांनी औषधे, बेड, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सीजन यंत्रणा, मनुष्यबळ यांची सज्जता करून ठेवावी अशा अनेक सुचना यावेळी देण्यात आल्या. याबाबत जे जे समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या की, कर्मचारी आणि परिचारिका यांची अनेकदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली होते. त्यामुळे आता हे मॉक ड्रिल होणे गरजेचे होते. मॉक ड्रिलमुळे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दोन्ही मिळाले. ज्या कर्मचाऱ्यांनी कोविडच्या काळात कोविड रुग्णांचा अनुभव घेतला नव्हता, अशा कर्मचाऱ्यांना यामुळे फायदा होणार आहे. रुग्ण वाढीनंतर मॉक ड्रिल करणे शक्य नव्हते, त्यामुळे मॉक ड्रिल साठी ही योग्य वेळ ठरणार आहे.
राज्य सरकारचे सेंट जॉर्ज हे सध्या पहिले कोविड समर्पित रुग्णालय असून या ठिकाणी आयसीयू आणि सर्व सोय असून सध्या पाच रुग्ण दाखल आहेत. येथील क्षमता १५० खाटांची तयार ठेवण्यात आली आहे. गरज लागल्यास जीटी हॉस्पिटल कोविड रुग्णालय करु, महिला आणि बाल रुग्णांसाठी कामा ऑलब्लेस तयार आहे. कोविडच्या रुग्णांना क्रिटीकल केअर देऊन सेंट जॉर्ज रुग्णालयात हलविण्यात येईल, असे नियोजन असल्याचे डॉ. सापळे यांनी स्पष्ट केले. जे जे रुग्णालय समुहात कोविड, नॉन कोविड कोणत्याही रुग्णांची आबाळ होणार नसल्याचे डॉ. पल्लवी सापळे यांनी यावेळी आश्वासित केले.
पालिकेच्या सायन रुग्णालयातही मॉकड्रिल :
सायन रुग्णालयात (Sion Hospital) देखील मॉक ड्रिल पार पडले असून यात रुग्णालयांना सज्ज राहण्याचा सल्ला देण्यात आला. प्रत्येक मुख्य रुग्णालयांना दहा बेड सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले असून उर्वरित रुग्णांना सेवेन हिल रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यासोबत रुग्णांची काळजी कशी घ्यावी तसेच तातडीचे उपचार देण्यासाठी डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काय करावे यासाठीचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आल्याची माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन जोशी यांनी दिली.