Twitter: @maharashtracity

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विशेष उद्योजकता पुरस्काराने ‘डिक्की’चे (DICCI) राष्ट्रीय समिती सदस्य आणि ॲथेनियम‌ सोल्यूशन्स प्रा. लि. चे संचालक अरुण धनेश्वर (Arun Dhaneshwar) यांचा शनिवारी (दि.‌ २६ नोव्हेंबर २०२२) येथे सत्कार करण्यात आला.

संविधान दिनाचे (Samvidhan Day) औचित्य साधत महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि पर्यटन विभागांतर्फे चेंबूरच्या द फाईन आर्टस् सोसायटी येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

याच कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या जीवनाशी निगडीत मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौद्ध लेण्यांवर आधारित नव्याने विकसीत करण्यात आलेल्या टूर सर्कीटचे, तसेच सामाजिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील तरुण-तरुणींच्या कौशल्य प्रशीक्षणाकरिता चेंबूर येथे तयार करण्यात आलेल्या केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले.

संविधान दिन ते महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Day) या समता पर्वात आयोजित या टूर सर्कीटमध्ये चैत्यभूमी, राजगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ व वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे. हा उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने पर्यटकांसाठी भविष्यात उपलब्ध करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातून तसेच परराज्यातून चैत्यभूमी दादर (Chaitya Bhoomi) येथे मोठ्या संख्येने अनुयायी आणि पर्यटक, अभिवा‍‌दन करण्यासाठी दरवर्षी भेट देत असतात. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे तसेच बौद्ध लेणी यांचे दर्शन घडविण्यासाठी हा सर्कीट (Bauddha circuit) बनवण्यात आला आहे, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दादर येथील चैत्यभूमी, महाड येथील चवदारतळे, नाशिक येथील काळाराम मंदिर व नागपूर येथील दीक्षाभूमी येथे करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here