@maharashtracity

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना जे जे रुग्णालयात (JJ Hospital) दाखल करण्यात आले आहे. देशमुख यांच्या खांद्याला मार बसल्याचे समजत आहे. देशमुख यांना शनिवारी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर विविध चाचण्या सुरु असल्याची माहिती जे जे रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

जे जे रुग्णालय समूहाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी अनिल देशमुख यांना सर जे जे रुग्णालयात शनिवारी दाखल करण्यात आले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. देशमुख सध्या अस्थिव्यंग विभागात दाखल असून अस्थिव्यंग विभाग प्रमुखांनी देशमुखांच्या काही तपासण्या सुचवल्या आहेत. या तपासण्या सध्या सुरु आहेत. या तपासण्या पूर्ण झाल्यावर त्यांचा आरोग्य अहवाल कळेल असे डॉ. सापळे यांनी सांगितले.

डॉक्टर – रुग्ण दरम्यान असलेल्या विश्वास नियमात बसणारी सर्व माहिती वेळोवेळी देण्यात येईल असेही डॉ. सापळे म्हणाल्या. दरम्यान, अनिल देशमुख हे कारागृहात पडले असल्याचे समजत आहे. मात्र, यावर डॉ. पल्लवी सापळे यांनी काही माहिती न देता अहवालानंतरच यावर भाष्य केले जाईल असे सांगितले. देशमुख यांच्या इतर शारिरीक तक्रारींसाठी इतरही विभागांना तपासणीकरीता सांगण्यात आले असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, खंडणी आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ED) गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अटक केली होती. तर १ एप्रिल रोजी सीबीआयने (CBI) त्यांना ताब्यात घेतले होते. काही दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने (PMLA court) देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) याना पत्र लिहिलं होते. या पत्रात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याना प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट दिलं होते, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी पत्रातून केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here