अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आश्वासन
Twitter: @maharashtracity
मुंबई: राज्यातील अंगणवाडी सेविकांनी हक्काच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे ठरवले असून ३ जानेवारीपासून त्या आझाद मैदानात ठाण मांडून होत्या. बुधवारी सायंकाळी उशिरा आंदोलनकर्त्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या भेटीनंतर अंगणवाडी सेविकांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे घोषित करण्यात आले.
दरम्यान, आंदोलनाच्या पहिल्या दिवशीच जोपर्यंत मुख्यमंत्री आमची भेट घेत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचे आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांनी सांगितले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनकर्त्या प्रतिनिधींची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर अंगणवाडी सेविकांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येत्या १२ जानेवारी रोजी मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.