@maharashtracity

मुंबई: मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव (corona pandemic) काहीसा कमी झालेला असला तरी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने घालून दिलेले नियम लागू आहेत. तरीसुद्धा सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, रेल्वे स्टेशन परिसरात ‘विनामास्क’ बिनधास्तपणे फिरणाऱ्या आणि कोरोनाबाबतच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या ३०.४४ लाख लोकांकडून  मुंबई महापालिकेच्या (BMC) क्लिनअप मार्शल, फिरते पथक आणि मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस यांनी, प्रति व्यक्ती २०० रुपये दंड याप्रमाणे कारवाई करून तब्बल ६१.२८ कोटींची कमाई केली आहे.   

यामध्ये, मुंबई महापालिकेने २५ जुलैपर्यंत ७ झोनमधील २४ वार्डात, फिरते पथक, ‘क्लिनअप मार्शल’ (Clean Up Marshal) यांच्यामार्फत २६ लाख ८ हजार ३८८ विनामास्क नागरिकांवर प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करून ५२ कोटी ५३ लाख १९ हजार ८०० रुपये दंड रक्कम वसूल केली आहे. 

तर मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वे पोलिसांनी २४ जुलैपर्यंत २३ हजार ८९१ विनामास्क नागरिकांना प्रत्येकी २०० रुपये दंड याप्रमाणे ५० लाख ३९ हजार २०० रुपये एवढी दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. तर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) विनामास्क ४ लाख १२ हजार ५१५ नागरिकांकडून ८ कोटी २५ लाख ३ हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. एकूणच ३० लाख ४४ हजार ७९४ विनामास्क नागरिकांकडून तब्बल ६१ कोटी २८ लाख ६२ हजार २०० रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here