@maharashtracity
मुंबई: सरकारने कोरोना रुग्णांवर (corona patients) उपचाराचे दर निश्चित केले असतानाही खासगी रुग्णालयांनी खिसे कापण्याचे काम केले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात लोक जादा शुल्क आकारणीचे बळी ठरले असून ४६२ तक्रारी न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती जन आरोग्य अभियानाचे डॉ. अभय शुक्ल यांनी दिली.
कोरोना काळात सरकारी रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांना वाचवण्यासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घेतला.
जादा शुल्क आकारणीसाठी (exorbitant bills) रुग्णालयांमध्ये ऑडिटरही (auditor) बसवण्यात आले होते. मात्र येथूनही रुग्णांना दिलासा मिळाला नसल्याच्या तक्रारी ऐकायला येत असल्याचे सांगण्यात आले.
डॉ.अभय शुक्ला यांनी सांगितले की, राज्यातील अनेक जिल्ह्यात सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने खासगी रुग्णालयांमध्ये (private hospitals) रुग्णांना दाखल करावे लागले. मात्र महामारीच्या काळातही काही खासगी रुग्णालयांनी उपचाराच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाइकांकडून जादा पैसे आकारले.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर कार्यवाही करण्यासाठी सरकारने तक्रार कक्ष स्थापन केला. या तक्रार कक्षात लोकांनी आपल्या तक्रारी मांडल्या, पण क्वचितच कोणाला न्याय मिळाला. यातील ४६२ लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अद्यापही पत्रव्यवहार सुरु असल्याची माहिती डॉ. शुक्ल यांनी दिली.
दरम्यान, मुंबई विभागातील तक्रारीबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, एका महिन्यात बहुतांश तक्रारींचे निराकरण केले असून ज्या तक्रारींमध्ये तथ्य नाही अशा तक्रारी फेटाळून लावल्या आहेत.
दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी ४६२ तक्रारी मिळाल्या असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या तक्रारी संबंधित जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आल्या असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे शिंदे म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या पहिल्या लाटेत २५ वर्षीय रिझवान खान याने बहीण गमावली. सरकारी रुग्णालयात खाट उपलब्ध न झाल्याने रिझवान यांनी बहिणीला खासगी रुग्णालयात केले. रिझवान यांना दोन खासगी रुग्णालयांकडून शुल्कासाठी नाडण्यात आले. यात चेंबूर (Chembur) येथील खासगी रुग्णालयाने रिझवानकडून केवळ दोन दिवसांच्या उपचारांसाठी एक लाख रुपये उकळले. तर दुसऱ्या एका खासगी रुग्णालयाने रिझवानकडून केवळ ४ तासांच्या उपचारासाठी ५० हजार रुपये घेतले असल्याची तक्रारी आहे.
या जादा दराबाबत तक्रार करून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला तरी अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मनीषा नावाच्या महिलेने पती गमावला. पतीला वाचवण्यासाठी मनिषाने खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च केले.
तसेच अशोक शिंदे यांनीही वडिलांना वाचवण्यासाठी ठाण्यातील (Thane) एका खासगी रुग्णालयात अवघ्या १२ दिवसांसाठी साडेतीन लाखांहून अधिक रुपये भरल्याची तक्रारी प्राप्त आहे. तर डोंबिवलीतील (Dombivli) अमोल साळवे याने भावाला वाचवण्यासाठी २३ दिवसांसाठी पावणे ४ लाख रुपये एका खासगी रुग्णालयात भरल्याची तक्रारी आहे. अशा स्वरुपाच्या ४६२ तक्रारी असल्याचे सांगण्यात आले.