@maharashtracity
मलबार हिलखालील बोगद्याचे काम पूर्ण
गिरगाव चौपाटीखाली बोगद्याचे काम सुरू
मुंबई: मुंबईतील विशेषतः पश्चिम उपनगरे परिसरातील वाहतूक कोंडी (traffic congestion) सोडवण्यासाठी व जलद प्रवास करण्यासाठी देशातील पहिल्या ‘कोस्टल रोड’च्या (coastal road) कामांतर्गत मलबार हिल खालील ७०० मिटर लांबीच्या बोगद्याचे काम ‘मावळा’ संयंत्राने नुकतेच पूर्ण झाले आहे.
आता गिरगाव चौपाटीखालील ९०० मिटर लांबीच्या बोगद्याचे काम सुरू करण्यात येत आहे. प्रिंसेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंकपर्यंतच्या १०.५८ किमी मार्गाचे सध्या ४० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाच्या पॅकेज -४ अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत प्रत्येकी २.०७ किमी लांबीचे दोन बोगदे ‘मावळा’ संयंत्राद्वारे ( टनेल बोअरिंग मशीन) खोदण्याचे काम ११ जानेवारी २०२१ ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरू करण्यात आले.
एक बोगदा उत्तर मुंबईकडे जाणारा तर दुसरा बोगदा दक्षिण मुंबईकडे येणारा असणारा आहे. या बोगद्याला अमरसन्स, हाजीअली व वरळी या तीन ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत. ११ ठिकाणी दोन्ही टनेल एकमेकांना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आप्तकाळात एका बोगद्यामधून दुसऱ्या बोगद्यात जाता येणार आहे. प्रत्येक बोगदा खोदण्यासाठी ९ महिने याप्रमाणे १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
कोरोना कालावधीतही कोस्टल रोडचे काम सुरू ठेवण्यात आले होते. आजही हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाच्या अंतर्गत प्रिंसेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंकपर्यंतच्या १०.५८ किमी मार्गाचे सध्या ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गातील एकूण दोन किमीच्या महाकाय बोगद्यांपैकी एका बोगदयाचे काम ११६० मीटर इतके खोदून पूर्ण झाले आहे.
मलबार हिल खालून ७०० मीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले असून आता गिरगाव चौपाटीखाली ९०० मीटर बोगद्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (BMC Commissioner I S Chahal) यांनी सांगितले.