कोरोना जनुकीय सूत्र निर्धारणांतर्गत १५ व्या फेरीतील चाचणीचे निष्कर्ष
२८८ नमुन्यांमध्ये सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या उपप्रकाराने बाधित
@maharashtracity
मुंबई: मुंबईत कोरोनावर (corona) नियंत्रण मिळविणे काही प्रमाणात शक्य झाले आहे. त्यामुळेच मुंबईत सण, उत्सव धुमधडाक्यात साजरे करणे शक्य झाले आहे. मात्र, अद्यापही कोरोनाचा प्रादूर्भाव पूर्णपणे हद्दपार झालेला नाही. कोरोनाचा उपप्रकार ‘ओमायक्रॉन’ (omicron) हा रुग्णांत आढळून येत आहे.
कोरोनाचे उपप्रकार नेमके कोणते, ते विशेष कार्यपद्धतीने शोधून संबंधित रुग्णांवर यशस्वी उपचार करणे शक्य होते. कोरोना विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण (genome sequencing) केल्यामुळे एकाच विषाणुच्या २ किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखता येतो. ज्यामुळे या अनुषंगाने उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सुलभ होते. परिणामी, ज्या रुग्णांना कोविड बाधा झाली आहे, त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते.
त्यानुसार, मुंबई महापालिकेने १५ व्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांचे निष्कर्ष नुकतेच हाती आले आहेत. त्यासाठी २८८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. हे सर्व नमुने १०० टक्के ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने बाधित आहेत. २८८ व्हेरिएन्टने बाधित झालेल्या रुग्णांचे ‘व्हेरिएन्ट’ नुसार विश्लेषण केले असता, २८८ नमुन्यांपैकी ३७% अर्थात १०६ नमुने हे बीए-२.७५ व्हेरिएन्टचे आहेत.
तसेच, ३३% अर्थात ९६ नमुने हे बीए -२.७५.१ व्हेरिएन्टचे आहेत. २१% म्हणजेच ६० नमुने हे बीए-२.७५.२ व्हेरिएन्टचे आहेत. २% अर्थात ६ नमुने हे प्रत्येकी बीए -५.२ व बीजे -१ या दोन व्हेरिएन्टचे आहेत. एकूण ४ नमुने हे बीए-२.७६ या व्हेरिएन्टचे आहेत. तर ३ नमुने हे बीए-२ या व्हेरिएन्टचे असून २ नमुने हे बीएच -१ या व्हेरिएन्टचे आहेत. तसेच बीए -२.१०.४ . बीए – २.७४, बीए – ५.१, बीई – १ आणि बीई – ३ या व्हेरिएन्टचे प्रत्येकी एक रुग्ण आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
‘कोरोना – १९’ विषाणूच्या जनुकीय सूत्रांचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग) हे ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे व फेरीनिहाय करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेल्या या कार्यवाही अंतर्गत १५ व्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.
२८८ चाचण्यांचे वयोगटानुसार विश्लेषण
२८८ रुग्णांपैकी ३२% अर्थात ९१ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील, ४१ ते ६० या वयोगटात देखील २७% म्हणजेच ७७ एवढे रुग्ण आहेत. तसेच, २९% म्हणजेच ८४ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील तर ३% म्हणजेच १० रुग्ण हे ‘० ते २०’ या वयोगटातील; तर ९% म्हणजे २६ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत.
त्याचप्रमाणे, या २८८ नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील ७ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, ३ नमुने हे ० ते ५ वर्षे या वयोगटातील आहेत, ६ ते १२ वर्षे या वयोगटात एकही नमुना आढळून आला नाही. तर ४ नमुने हे १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या कोविड विषाणुच्या उप प्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले. तथापि, या रुग्णांना कोविड बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.
२८८ नमुन्यांचे लसीकरणानुसार विश्लेषण
२८८ रुग्णांपैकी १% अर्थात २ रुग्णांनी लसीची केवळ एकाच मात्रा घेतली आहे.
७०% अर्थात २०२ रुग्णांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत.
२९% अर्थात ८४ रुग्णांनी लसीची एकही मात्रा घेतलेली नाही.
कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन
कोरोनाशी संबंधित सर्व रुग्ण १२ जून ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीतील आहेत. तसेच हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, विविध उप प्रकारातील कोरोना विषाणुची होणारी लागण लक्षात घेता, ‘कोरोना – १९’ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरोना प्रतिबंधात्मक लशीच्या सर्व मात्रा या वैद्यकीय सल्ल्यानुसार वेळच्यावेळी घेणे, ज्यांनी लशीच्या पहिली एक मात्रा घेतली आहे, त्यांनी दुसरी मात्रा घेणे आणि ज्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे, त्यांनी लशीची वर्धक मात्रा घेणे आवश्यक असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. सर्व मुंबईकर नागरिकांनी या उपाययोजनांची कटाक्षाने व कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.