मुंबईत पूर्व उपनगरात – ४ तर पश्चिम उपनगरात – ७ ठिकाणी दरड, घरांची पडझड
चेंबूर येथील दुर्घटनेत १५ जण मृत ; २ जण जखमी
विक्रोळी येथील दुर्घटनेत ५ जण मृत
भांडुप येथील दुर्घटनेत १ जण मृत
चांदीवली येथील दुर्घटनेत २ जण जखमी
@maharashtracity
मुंबई: मुंबईत रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसात मुंबईकर झोपेत असताना निसर्गाने मोठा घात केला. पूर्व उपनगरात – ४ तर पश्चिम उपनगरात – ७ ठिकाणी दरड, घरांची पडझड झाली. चेंबूर, भांडुप व विक्रोळी अशा तीन ठिकाणी दरड, भिंत व घरे कोसळून झालेल्या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण जखमी झाले आहेत.
चेंबूर, भारत नगर येथे घरावर संरक्षक भिंत, दरड कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. तर विक्रोळी , सुर्यनगर येथे दरड घरांवर कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत.
तसेच, भांडुप येथेही घराची पडझड होऊन
सोहम महादेव थोरात (१६ ) या मुलाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.
त्याचप्रमाणे, पवई, चांदीवली येथे दरड कोसळून २ जण जखमी झाले आहेत.
या दुर्घटनांच्या ठिकाणी उशीरापर्यंत ढिगारा उपसण्याचे व बचावकार्य, शोधकार्य सुरू होते.
या दुर्घटनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी दखल घेऊन दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींवर रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येत आहेत.
चेंबूर येथे १५ जणांचा मृत्यू
मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, वाशी नाका, चेंबूर, न्यू भारत नगर, वांझार दांडा, माहुल येथे मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास नागरिक झोपेत असताना डोंगरभागातील दरड व संरक्षक भिंत अचानकपणे ४ -५ घरांवर कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत.
या १५ जणांमध्ये ८ महिला, ५ पुरुष तर २ लहान मुलांचा समावेश असल्याचे समजते. तर २ जण जखमी झाले होते. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.
घटनास्थळी पालिका वार्ड स्तरावरील कामगार, अग्निशमन दल, एनडीआरएफ या यंत्रणांकडून कोसळलेल्या दरडीचा, माती, चिखलयुक्त ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दुर्घटना घडली त्यावेळी नागरिक झोपेत होते. घटना घडताच एकच आरडाओरड झाली. त्यामुळे स्थानिकांनी अग्निशमन दलाची (Fire Fighter department) वाट न पाहता तात्काळ मदतकार्य सुरू केले होते. नंतर अग्निशमन दल, एनडीआरएफ (NDRF), पोलीस (Police), वार्डातील कामगार आदी यंत्रणा एकेक करून घटनास्थळी पोहोचली व मदतकार्य जलदगतीने सुरू झाले. मात्र ढिगाऱ्यामधून १९ जणांना बाहेर काढून नजीकच्या राजावाडी रुग्णालयात नेले असता त्यापैकी १७ जण गंभीर जखमी झाल्याने अगोदरच मृत झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर दोघा जखमी लोकांवर तात्काळ उपचार करून त्यांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले आहे.
विक्रोळी येथे ५ जणांचा मृत्यू
विक्रोळी (प.), सुर्यनगर येथे डोंगराळ भागात मध्यरात्री २.४० वाजेच्या सुमारास नागरिक झोपेत असताना ६ घरांवर दरड घरावर कोसळली. या दुर्घटनेत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल व वार्डातील कामगार यांच्यामार्फत ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. या ठिकाणी डोंगराळ भाग असल्याने घटनास्थळी वाहनाने जाण्यात अडचण होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दल व पालिका यंत्रणेला ढिगारा उपसण्याच्या कामात मोठी मदत केली.
भांडुप येथे मुलाचा मृत्यू
भांडुप ( प.) , कोंबडगल्ली, अमरकुल विद्यालयाजवळ एका चाळीत पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास रहिवाशी झोपेत असताना घराच्या भिंतीचा भाग पडला. या दुर्घटनेत सोहम महादेव थोरात (१६) या मुलाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे. त्याला नजीकच्या अग्रवाल रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दल, पालिका यंत्रणा व पोलीस यांनी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले होते.
चांदीवली येथे दोघे जखमी
पवई, चांदीवली (Chandivli) परिसरातील संघर्ष नगर, इमारत क्रमांक १९ येथे सकाळी ६ वाजेच्या सुमारास दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने नजीकच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
पालिकेने नोटीसा बजावल्या होत्या -: महापौर
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी, या दुर्घटनांबाबत दुःख व्यक्त केले आहे. मात्र मुंबई महापालिका (BMC) दरवर्षी डोंगराळ भागात, धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या, धोकादायक संरक्षक भिंतीजवळ राहणाऱ्या नागरिकांना दुर्घटना होण्याची व त्यात जीवित, वित्तीय हानी होण्याची शक्यता लक्षात घेता पावसाळयापूर्वीच नोटिसा बजावून धोक्याचा पूर्वइशारा देते, अशी माहिती स्थानिक वार्ड कार्यालयातून अधिकाऱ्यांनी दिल्याचे महापौरांनी सांगितले.