@maharashtracity
मुंबई: कुर्ला (पश्चिम) येथील टॅक्सीमेन्स कॉलनी ते श्रीकृष्ण चौकापर्यंत पादचाऱ्यांसाठी २० कोटी रुपये खर्चून ‘ स्कायवॉक’ बांधण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.
पूर्व उपनगरातील पालिकेच्या ‘एल’ वार्डातील कुर्ला (Kurla) या गजबजलेल्या भागात नागरिकांना रस्ते, पदपथावरून चालणे अवघड व जीवघेणे झाले आहे. त्यातच रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्याचा कुर्लावासीयांना त्रास होत आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व रहिवाशी यांच्या सततच्या मागणीवरून टॅक्सीमेन्स कॉलनी ते श्रीकृष्ण चौकापर्यंत पादचाऱ्यांसाठी २० कोटी रुपये खर्चून ‘ लवकरच ‘स्कायवॉक’ (Skyealk) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या स्कायवॉकच्या बांधकामासाठी नियोजन, संकल्पचित्रे, अंदाजपत्रक व मसुदा निविदा बनविण्यासाठी तांत्रिक सल्लागार पॅनलमधील मे. कन्सट्रुमा कन्सल्टन्सी प्रा. लि. याची तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी या सल्लागाराला २८.५२ लाख रुपये देण्यात येणार आहे.
हा स्कायवॉक ३०० मिटर लांबीचा आणि ४.२५ रुंदीचा असणार आहे. सट्रक्चरल स्टील व आर.सी.सी. पद्धतीचे बांधकाम असणार आहे. तसेच, या स्कायवॉकसाठी २ एस्केलेटर असणार आहेत. या स्कायवॉकच्या कामासाठी अडथळा ठरणारी भूमीगत केबल सेवा वळविण्यासाठी कंत्राटदाराला तब्बल ५० लाख रुपये देण्यात येणार आहेत.
सदर प्रस्तावाला स्थायी समितीकडून मंजुरी मिळाली व काम सुरू करण्यासाठी कार्यादेश मिळाले की टेंडरमधील अटी व शर्तीनुसार पुढील १५ दिवसात कंत्राटदाराने कामाला सुरुवात करणे अपेक्षित आहे. तसेच, कार्यादेश मिळाल्यापासून पावसाळा वगळता १५ महिन्यात सदर काम पूर्ण करावे लागणार आहे. या स्कायवॉकच्या एकूण कामासाठी पालिका कंत्राटदाराला १९ कोटी ४१ लाख रुपये मोजणार आहे.