बँकेच्या अध्यक्षपदी विवेक पत्की तर, उपाध्यक्षपदी शरद गांगल
ठाणे: देशात सहकार क्षेत्रात सातत्याने आघाडीवर असणाऱ्या टीजेएसीबी (TJSB) सहकारी बँकेच्या (bank) संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. या संचालक मंडळाचा कालावधी २०२० ते २०२५ असा पाच वर्षांसाठी आहे.
सी. नंदगोपाल मेनन, सीए विवेक पत्की (CA Vivek Patki), रमेश कनानी, ऍड.प्रदिप ठाकूर, दिलीप सुळे, अनुराधा आपटे, मधुकर खुताडे या विद्यमान संचालकांसह डॉ. अश्विनी बापट, शरद गांगल, ऍड. समीर कांबळे, सीए वैभव सिंंघवी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
संचालक मंडळाच्या निवडीसह बँकेच्या अध्यक्षपदी सीए विवेक पत्की, तर उपाध्यक्षपदी शरद गांगल यांची निवड झाली आहे. नवनियुक्त अध्यक्ष विवेक पत्की यांची लेखा परिक्षक (auditor) म्हणून प्रदिर्घ कारकीर्द आहे. आर्थिक (finance) आणि बँकिंग (banking) क्षेत्रातील ते जाणकार आहेत.
उपाध्यक्षपदी निवड झालेले शरद गांगल हे मनुष्यबळ विकास (Human Resources) तज्ञ आहेत. औद्योगिक क्षेत्रात मनुष्यबळ विकासात शरद गांगल यांचे नाव अग्रणी आहे. शरद गांगल यांनी यापूर्वीही बँकेचे संचालक म्हणून काम केले आहे.
बँकेच्या संचालक मंडळात लेखा परिक्षक, उद्योजक, मनुष्यबळ विकास, विधिज्ञ, आर्थिक-सहकार-बॅंकिंग जाणकार आणि सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातील घटकांचा समावेश आहे. संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडीने अनुभव, तज्ञता आणि तरुणाई याचे नेमके संतुलन साधले आहे.
टीजेएसबी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक रविवार दिनांक १५ डिसेंबर रोजी बहुराज्यीय सहकारी संस्थाच्या वर्ष २००२ च्या कायद्यानुसार झाली. ठाणे महानगर पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. बँकेच्या सर्वसाधारण सभेत निवडणूक अधिकारी संदीप माळवी यांनी निवडणूकी बाबत घोषणा केली.