Twitter : @milindmane70

महाड

रायगड विकास प्राधिकरणांतर्गत रायगड वाडी ते छत्री निजामपूर हा मे महिन्यात बनवलेला रस्ता निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच पावसात वाहून गेल्याची घटना घडल्याने रायगड विकास प्राधिकरणाच्या कामावर शंका व्यक्त केली जात आहे.

महाड तालुक्यातील किल्ले रायगडजवळ छत्री निजामपूर गाव आहे. या गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम रायगड विकास प्राधिकरण अंतर्गत या वर्षी एप्रिल महिन्यापासून सुरू होते. रायगड वाडी ते छत्री निजामपूर हा रस्ता मूळ जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. मात्र जिल्हा परिषदेची कोणतीही परवानगी न घेता रायगड विकास प्राधिकरणाने या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले. या रस्त्यावर सुरुवातीपासून वापरण्यात येणारा दगड निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप गावकरी करत होते. तसेच खडी देखील निकृष्ट दर्जाची आहे. डांबरीकरणाचे काम सुरू असताना त्यात अत्यल्प प्रमाणात डांबर वापरल्याची तक्रार रायगड किल्ल्याजवळील 21 गाव संघर्ष समितीने यापूर्वी केली होती. मात्र समितीने केलेल्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून रायगड विकास प्राधिकरणाने या भ्रष्टाचारी ठेकेदाराला पाठीशी घालून त्या रस्त्याचे काम पूर्ण केले.

रायगड विकास प्राधिकरणामार्फत रायगड वाडी ते छत्री निजामपूर या रस्त्याच्या कामाला केवळ अडीच महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून गेल्याची धक्कादायक घटना 19 जुलै रोजी घडली. याबाबत रायगड प्राधिकरणाच्या शाखा अभियंता स्वप्नील गुर्ले यांना विचारले असता त्यांनी हा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे, असे सांगून आपली जबाबदारी ढकलली. तर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला असता कोणीही बोलण्यास तयार नाहीत. असे असले तरी रायगड प्राधिकरणाकडून करण्यात आलेली कामे किती निकृष्ट दर्जाची आहेत, हे या वाहून गेलेल्या रस्त्याच्या घटनेवरून उघड झाले आहे.

रायगड विकास प्राधिकरणाचे शाखा अभियंता स्वप्नील गुर्ले यांनी हे काम प्राधिकरणाकडून मागील तीन वर्षांपूर्वी झाले होते, मात्र केवळ नूतनीकरण प्राधिकरणांमधून झाले आहे, असे त्यांनी मान्य केले. मात्र आता हा रस्ता वाहून गेला, ते पुरहानीमुळे झाले असून त्याची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेची आहे, कारण रस्त्याची मालकी त्यांची आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here