औरंगाबाद: नोटाबंदी (demonetisation) झाल्यानंतर भारतीय चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १ हजार रूपये किंमतीच्या जवळपास १ कोटी रूपयांच्या नौटा देवून त्या बदल्यात शहरातील व्यापाऱ्यांकडून चालू चलनातील नोटा घेण्यासाठी आलेल्यास पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. ही कारवाई गुरूवारी (दि.२६) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय चलनातून बाद झालेल्या नोटा शहरातील व्यापाऱ्यांना देवून त्या बदल्यात चालू चलनातील नोटा घेण्यासाठी इसाक शहा शब्बीर शहा (वय ४०, रा.भानसहिवरा, ता. नेवासा,जि.अहमदनगर,ह.मु. गंगापुर, औरंगाबाद) (Aurangabad) हा येणार असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहाय्यक आयुक्त गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक दिलीप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे, जमादार रमेश सांगळे, गुन्हे शाखेचे द्वारकादास भांगे, अजय आवले, उस्मानपुरा डी.बी.पथकाचे सहाय्यक फौजदार कल्याण शेळके, जमादार प्रल्हाद ठोंबरे, संजय डोभाळ, संतोष सिरसाट आदींच्या पथकाने उस्मानपुरा परिसरातील गोपाळ टी पॉईन्ट जवळ सापळा रचून इसाक शहा शब्बीर शहा याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान औरंगाबाद येथील मोहमंद नईम मोहमंद इब्राहिम, (वय ४५, धंदा व्यापार रा. सदफ कॉलनी, कटकटगेट, प्लॉट नं. २४, मोगल दरबार हॉटेलच्या मागे, औरंगाबाद) व मोहमंद इलियास मोहमंद युनुस, वय ३८, रा. संब्जीमंडी, बागवान मंदिरा जवळ, औरंगाबाद) यांच्या मदतीने चलनातून बाद झालेल्या नोटा औरंगाबादेत बदलून घेणार असल्याचे सांगितले. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here