@By निलेश कुलकर्णी

@NileshkumarMK

देशात ऐतिहासिक सत्तापरिवर्तन झाले. त्याच्या पूर्वसंध्येला दयानंद कांबळे (Dayanand Kamble) दिल्लीत रूजू झाले. महाराष्ट्र सदनातील (Maharashtra Sadan) लाॅजमध्ये माझी त्यांची पहिली भेट झाली. पहिल्या भेटीतच हा माणूस ‘आपला’ वाटला. त्यात ते गाववाले निघाले. मग काय मैत्र जुळायला फार वेळ लागलाच नाही.

महाराष्ट्र सदनातील ‘रूम नंबर १३२’ ही कांबळेंची तात्पुरती निवासव्यवस्था मग आमचा गप्पाष्टकांचा अड्डा बनली. याच सदनात ते राहत असताना कधी माजी मंत्री माधवराव किन्हाळकरांसोबत बाहेरच्या ढाब्यावर जाऊन डिनर किंवा माजी खासदार रवींद्र गायकवाडांसोबत (Former MP Ravindra Gaikwad) बाहेरच्या टपरीवरचा चहा असा दिनक्रमच ठरला.

गोपिनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या अकाली आणि चटका लावणाऱ्या मृत्यूच्या दिवशी आम्ही एकत्रच होतो. त्या अस्वस्थ दिवशी आम्ही जेवलोही नाही, हे अजूनही लक्षात आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्र हे खरे तर दिल्लीतील (Delhi) महाराष्ट्र शासनाची ‘ॲम्बीस’च (Embassy) म्हटली पाहिजे. राज्य सरकारच्या ध्येय धोरणाचा प्रचार प्रसार आणि अवघ्या देशाला जगाला महाराष्ट्राशी जोडण्याचे काम हे कार्यालय करते. साधारणत आपल्याकडे सरकारी कार्यालये म्हणजे नस्तींचा कुबट वास आणि तसेच नकारात्मक वातावरण, असे चित्र असते.

दयानंद कांबळे आठ वर्षे दिल्लीत राहिले आणि त्यांनी सोशल मीडियाच्या (social media) बाबतीत एमआयसीला (MIC) एका वेगळ्या उंचीवर नेले. ऐकेकाळी सोशल मीडिया म्हणजे सरकारी नोकरीत ‘पाप’ मानले जायचे. सोशल मीडियाबाबतची ‘अस्पृश्यता’ कमालीची होती. टिपिकल सरकारी बातम्यांवर या खात्याची भिस्त होती. परंतु काळानुसार प्रत्येकालाच बदलावे लागते.

देशाचे पंतप्रधान (PM) एक ट्विट (tweet) करतील आणि त्याची जगभर बातमी होईल, अशी कल्पना कोणी कधीकाळी केली असेल काय? मात्र, कांबळेंनी हे व्हिजन दाखविले. वेगवेगळ्या घडामोडींवरच्या त्यांच्या टिव्टसला खूप प्रतिसाद मिळाला.

एमआयसीसारख्या एका सरकारी कार्यालयाच्या ट्विटर हॅंडलला हजारोंनी फोलोअर्स मिळाले. राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan), पंतप्रधान कार्यालयालाही (PMO) या ट्विट्सची दखल घ्यावी लागली. अनेक केंद्रीय मंत्री, राज्यातले मंत्री त्याची दखल घ्यायला लागले, फाॅलो करायला लागले.

अर्थात हा बदल एका दिवसात घडणारा नव्हता. तो कांबळे यांनी जाणीवपूर्वक घडवून आणला. ‘मीडिया’ एमआयसीच्या ट्विटरवर व बातम्यांवर अवलंबून राहू लागला. हा एक विलक्षण वेगळा बदल त्यांनी घडवून आणला. दररोज कुठली तरी संशोधनात्मक बातमी, महाराष्ट्राच्या संदर्भातील बातमी गेलीच पाहिजे, हा त्यांचा शिरस्ता होता.

त्यानुसार त्यांनी अनेकविध बातम्यांना वाव दिला. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या तीन मुख्यमंत्र्याच्या (CM) कार्यकाळात त्यांनी उत्तम काम केले. फडणवीस मुख्यमंत्री असताना गुजरात (Gujarat) की कुठल्या तरी राज्यात गेले होते. त्यांचा तिथल्या कार्यक्रमाचा फोटो मिळत नव्हता. कांबळेंनी तो चुटकीसरशी मिळवून आपली कार्यक्षमता सिद्ध केली.

विविध राज्यातील परिचय केंद्रातील अधिकाऱ्यांची मिळून त्यांनी एक फोरम बनवली. त्यातही चांगले काम केले. पंजाबमधल्या (Punjab) घुमानमध्ये (Ghuman) झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पंजाबी भाषेत ‘मेक इन महाराष्ट्र’ च्या (Make in Maharashtra) निर्मितीची ‘आयडीयाची कल्पना’ ही या कांबळेंचीच!

पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल (Prakash Sinh Badal) यांनी या उपक्रमाची भरभरून प्रशंसा केली होती. पंजाबमधील घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेणारी “मेक इन महाराष्ट्र” ही पंजाबी भाषेतील पुस्तिका प्रकाशित केली.

दिल्लीत सलग २ वर्ष त्यांनी सोशल मीडिया (social media) आणि शासनातील जनसंपर्क (Public Relations) या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली. यामुळे देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेश महाराष्ट्र परिचय केंद्राशी आणि पर्यायाने महाराष्ट्राशी जोडले गेले. मला व्यक्तिशः सोशल मीडियावर सक्रिय करण्याचे निसंशय श्रेय हे कांबळे यांचेेच.

सांगण्यासारखे पुष्कळ आहे. दिल्लीत एकतर मराठी माणूस येत नाही आला तर टिकत नाही, असा अनुभव आहे. अशा स्थितीत दयानंद कांबळे दिल्लीत घट्ट पाय रोवून उभे राहिले. आता महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागात (DGIPR) मुंबईत ते रुजू होत आहेत. एक उत्तम कारकिर्द गाजवून कांबळेंनी दिल्लीला आणि आम्हाला अलविदा केले आहे. अर्थात मैत्रबंध कायमच राहतील. मुंबईत गणेश रामदासी (Ganesh Ramdasi), दयानंद कांबळे Dayanand Kamble) आणि गोविंद अहंकारी (Govind Ahankari) हे तीन घट्ट मित्र राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्याची धुरा यापुढे वाहतील. हे तिघेही गाववाले आहेत हे विशेष!

एमआयसीच्या कार्यालयाजवळच्या हनुमान मंदिरात आपला चहा आणि ब्रेड पकोड्याचा नेहमीचा पाहुणचार कायमच स्मरणात राहील.

दयानंदजी कांबळे आपणास नव्या इनिंगसाठी खूप शुभेच्छा!

(लेखक नीलेश कुलकर्णी हे दैनिक सामना चे नवी दिल्लीत ब्युरो चीफ आहेत. ते गेली अनेक वर्षे दिल्लीत पत्रकारिता करत आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here