By Sunil Mane

Twitter : @maharashtracity

ज्येष्ठ जलतज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्याबरोबर २००६ मध्ये औरंगाबादमध्ये त्यांच्या घरी राज्यातला पाणी प्रश्न, वेगवेगळ्या नद्या, शेतकऱ्यांचे पाणीप्रश्न या विविध विषयांवर एकदा सविस्तर चर्चा करायला बसलो होतो. यावेळी पुण्यातील मुठा नदीचे प्रदूषण आणि त्या संदर्भातले प्रश्न यावर चर्चा झाली. सकाळ वृत्तपत्रसमूहाचे प्रमुख श्री. अभिजीत पवार यांना मी या चर्चेचा तपशील सांगितला. आगामी काळात कळीचा ठरणारा नद्या स्वच्छ करणे आणि त्यांचे पुनरुज्जीवन हा आमच्या या चर्चेतला महत्त्वाचा मुद्दा होता. 

या विषयावर जगात जी कामे झालीत त्यातला प्रमुख प्रयोग लंडनमधल्या थेम्स नदीचा आहे. अभिजीत पवार यांनी मला ‘सकाळ’च्या वतीने लंडनला त्यासाठी जाण्याचा प्लॅन करण्यासाठी सांगितलं, त्यानुसार मी नियोजन करायलाही लागलो. पण मी थोड्याच दिवसात दिल्लीला पत्रकारितेसाठी गेल्यामुळे हा विषय मागे पडला. लंडन माझं जगभरातील एक आवडत्या प्रमुख शहरांपैकी एक शहर आहे आणि त्याची कारणेही वेगवेगळी आहेत. 

ब्रिटिशांनी जगावर शेकडो वर्षे सत्ता गाजवली, राज्य केलं. त्या अर्थाने लंडन ही अनेक वर्षे जगाची राजधानी होती. ब्रिटिशांनी अतिशय अमानुष आणि निष्ठुरपणे अनेक ठिकाणी राज्य केले हे आपण सर्वजण जाणतोच. पण त्याची दुसरी बाजू म्हणून त्यांचा या राज्यकारभारासाठीचा दृष्टिकोन आणि त्यांची हुकूमत गाजवण्याची प्रवृत्ती तसेच तिच्या मागे असलेली त्यांची विचार करायची पद्धत, साहस हे सुद्धा विचारात घ्यावे लागेल. संकटांना न डगमगता आव्हान देण्याची त्यांची पद्धत या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, असे मला वाटते.

ब्रिटिशांनी जगभर राज्य करत असताना कामाचा एक वेगळा ठसा आणि एक वेगळा मापदंड जगासमोर घालून दिलेला आहे. त्यामुळे ब्रिटिशांकडून आपण ज्या – ज्या काही गोष्टी घेतल्या त्याचा उगम असलेले ठिकाण म्हणजे लंडन. या दृष्टीने लंडन कसं आहे हे पाहण्याची उत्सुकता माझ्यासारख्या अभ्यासकाला नेहमीच होती, आहे आणि कायम राहील. लंडन माझं एकदा बघून झालं, यानंतरच्या काळातही अनेक विषयांसाठी लंडनला जाणं मला नेहमीच आवडणार आहे.        

जगाची राजधानी म्हणून बहरत असताना लंडनने आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक, सांस्कृतिक, व्यापार, विज्ञान- तंत्रज्ञान, लष्करी, कला-क्रीडा, मनोरंजन, दळणवळण आणि या अनुषंगिक सर्व क्षेत्रांमध्ये आपला दबदबा निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येतं. जगभरातल्या मानवी संस्कृती लंडनमध्ये एकत्र राहत असल्याचे दिसतं, कारण जवळपास तीनशे भाषा बोलणारे लोक या शहरात राहत असल्याचे सांगितलं जातं. 

जगभरातल्या ज्या आस्थापन आहेत त्यांची निर्मिती, त्यांचं कामकाज आणि त्यांचे स्वरूप यावर ब्रिटिशांची छाप आहे. त्यांची अशी एक व्यवस्था उभी राहिलेली दिसते. लंडनमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींचे पाऊलखुणा सतत दिसतात.

दुसऱ्या महायुद्धात हिटलरने लंडनवर बॉम्ब वर्षाव केले. पण एकसंघ होऊन लढण्याची प्रवृत्ती आणि संकटातून पुन्हा उभं राहण्याची प्रवृत्ती हा इंग्लिश माणसाचा स्वभाव आहे. देशासाठी एकरूप झालेल्या सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा प्रागतिक स्वभाव लंडनच्या जनतेत मुरला आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतीय मूळ असलेली व्यक्ती पंतप्रधान तर पाकिस्तानी व्यक्ती लंडनचा महापौर बनतो. हा स्वभाव या शहराला व्हायब्रंट करतो.

आज पुण्यातील मुठा नदी, दिल्लीची यमुना आणि अन्य नद्या ज्या अवस्थेत आहेत तशी लंडनची थेम्स काही दशकांपूर्वी होती. गटार बनलेली थेम्स ही मृत नदी असल्याची घोषणा १९५७ मध्ये करण्यात आली. कारण नदीच्या पाण्यात शून्य ॲाक्सीजन असल्याने मासे आणि अन्य जीव मरु लागले होते. पण लंडनच्या नागरिक व प्रशासनाने ही नदी पुन्हा जिवंत करण्याचा निश्चय करत नियोजनाने काम केले. त्यांनी साठ सत्तर वर्षे या नदीला पुन्हा जिवंत करण्यासाठी कामे केली. त्यामुळे मानवी चुकांमुळे निसर्गाची झालेली भयानक अवस्था पुन्हा मानवी सुधारणांनी पूर्वपदावर येऊ शकते याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे. 

आज थेम्स नदीत विविध प्रकारचे मासे आणि जीव पुन्हा राहत आहेत. नदीची दुर्गंधी संपली आहे. लंडनमधील या नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर अतिशय सुंदर अशी व्यवस्था तसेच दिमाखदार वैभव आहे. त्याचबरोबर लोकांची निवांतपणे वावरणे, बसणे, तिथल्या वेगवेगळ्या रिक्रिएशन्स आणि मनोरंजनांच्या सोयी उपलब्ध करणे, लहान मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी सोयी सुविधा यांच्या सोयी आहेत. 

पवित्रता एवढाच विशेष लक्षात न घेता, नदी ही आपल्या मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे याचे सतत भान आणि त्याची काळजी हा एक विशेष गुण मला लंडनच्या या थेम्सच्या पुनर्जीवनाच्या प्रकल्पात आढळला. 

पुण्यातली मुठा नदी असो किंवा वेगवेगळ्या शहरांमधल्या प्रमुख नद्या असोत, यांचे जे स्वतः स्वरूप झालंय ते बदलण्याचा आपण प्रयत्न करतोय. पण त्याला आणखी खूप व्यापक स्वरूप द्यावं लागणार आहे. आपण शहराच्या एका भागात नदीचा पुनरुज्जीवन करू आणि पुढच्या भागात ती गटारगंगेसारखी वाहत राहील तर हे कायमस्वरूपी टिकणार काम राहत नाही. याच्यासाठी खूप व्यापक दृष्टिकोन आणि सर्वांकष धोरण असावे लागते, हे लंडन शहराने केलंय. त्यात आपण मागे असू नये अशी माझी एक भावना आहे. 

भारताच्या आधुनिक शहरांसाठी ट्रान्सपोर्टेशन हा एक महत्त्वाचा भाग असणार आहे.  रेल्वे, मेट्रो, विमानतळ आणि रस्त्यांची वाहतूक त्याचबरोबर जलवाहतूक या सगळ्या गोष्टी लंडनने नियोजनबद्धरित्या केलेले आपल्याला दिसते. एक सत्ता केंद्र असल्यामुळे त्यांना ते शक्य झालं. आपल्यासारख्या विकसनशील देशांना हे करताना आर्थिक दृष्टीने मर्यादा पडतात. पण तरीही या पुढच्या काळात जेव्हा आपण विकसित देशाच्या दिशेने पुढे जाऊ, त्यावेळेस त्याचा एक सर्वंकष विचार करून धोरण आखायला लागेल. नद्यांचा वापर जलवाहतुकीसाठी करणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पुण्यासारख्या शहरात मलाच या गेल्या ४५ वर्षाच्या पाहण्यात नदीतून जलप्रवास कधीही झालेला दिसला नाही. पुढच्या काळात ज्यावेळेस नद्यांची सुधारणा होईल, नद्यांची पात्र स्वच्छ सुंदर होऊन पाणी चांगलं होईल त्यावेळेस हे एक स्वप्न न राहता आगामी काळात एक वस्तू स्थिती म्हणून पुणेकरांना दिसून येईल.

लंडनच्या मेट्रोचे म्हणजे अंडरग्राऊंडचे जाळे  एक माझ्या औत्सुक्याचा आणि महत्त्वाचा अभ्यासाचा विषय होता. जगात सर्वप्रथम लंडनला अंडरग्राउंड मेट्रो सुरू झाली. तिचं शेकडो किलोमीटरच जाळं संपूर्ण लंडन शहराच्या खाली पसरलेले आहे. लंडनच्या कुठल्याही भागात जायचं असेल तर तुम्हालाही मेट्रोची व्यवस्था उपलब्ध आहे. जिथे जिथे तुम्हाला अंडरग्राउंड असे बोर्ड दिसतात. तिथून तुम्हाला स्टेशनपर्यंत खाली जाता येतं आणि कोठेही जायला तेथून मिनिटा मिनिटाला मेट्रोच्या रेल्वे उपलब्ध असतात. 

आपल्याला कुठल्याही भागात जाण्यासाठी सुरळीत वाहतुकीची व्यवस्था असेल तर रस्त्यावरच कनेक्शन, रस्त्यांवरची वाहतुकीची जी काही समस्या आहे तिच्यापासून सुटका होईल. यासाठी एक खूप मोठी व्यवस्था लंडनने शहरात करून घेतली. लंडनमध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एक हा महत्त्वाचा विशेष म्हणून पाहायला पाहिजे. 

लंडनची ट्राम बस हा खूप वेगळा विषय आहे. डबल डेकरचा उदय लंडनमध्ये झाला. शंभर एक वर्षांपूर्वी स्पोर्टच्या कार्यक्रमासाठी लंडनमध्ये लाखो लोक आले होते. त्यांना ठिकठिकाणी पोहोचवण्यासाठी बसमध्ये कसं  सामावून घ्यायचं हा प्रश्न निर्माण झाला होता. यावर बसच्या टपावर खुर्च्या ठेवून त्या बांधून त्याच्यावर लोकांना बसवून घेऊन जाण्याची युक्ती त्यावेळी सुरू झाली आणि तिच्यातून डबल डेकर बसची निर्मिती झाली. आपण मुंबईसारख्या शहरात त्या पाहिल्या. पुण्यातही काही बसेस होत्या. जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी डबल डेकर बसची सुरुवात झाली, प्रघात पडला तो लंडनच्या या वेगळ्या प्रकारातून सुरू झालेला दिसतो. डबल डेकर बस असो किंवा वेगवेगळ्या बस सतत लंडनच्या रस्त्यांवर धावताना दिसतात. स्वच्छ आणि सुंदर बस वाहतुकीची अशी सक्षम सुविधा येथे दिसून येते. यातून लंडन वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय आदर्श शहर असल्याचे मला दिसून आले. या स्वरूपाचे व्यवस्थापन पुण्यासारख्या शहरात आणखी सक्षमपणे करू शकलो तर लोकांचा वाहतुकीवरचा जो वेळ,पैसा जातो या सगळ्या गोष्टीतून सुटका व्हायला खूप मदत होईल. 

सुमारे साडेतीनशे एकर पसरलेले लंडनचे हाईड पार्क माझ्या दृष्टीने खूप जिव्हाळ्याचा, उत्सुकतेचा आणि खूप आकर्षणाचा विषय आहे. मी लंडनमध्ये राहत असताना हाईड पार्कमध्ये रोज सकाळी वॅाकचे जे सुख घेतले त्याला तोड नाही. अशा सुंदर पार्कचा मनमुराद आणि शंभर टक्के आस्वाद घेणे हा आगळा अनुभव असतो. इतकी सुंदर बाग, सुंदर वृक्षराजी, विविध पक्षी, तळ्यांमध्ये पोहणारी बदके, वेगवेगळे पक्षी यामुळे हाईड पार्क जिवंतपणाचे अनोखे वैभव आहे. लोकांना अल्हाददायक वाटेल अशा पद्धतीने त्याचे मेंटेनन्स किंवा त्याची स्वच्छता राखली गेली आहे. पुण्यासारख्या शहरात आपल्याला अशा प्रकारच्या व्यापक पार्कचा भाग तयार करण्याचे नियोजन मुळात सुरुवातीलाच करण अपेक्षित होतं. आपल्याकडे मोठ्या बागा आहेत पण महानगर म्हणून जेव्हा आपण उदयास येत असतो, त्यावेळेस या पद्धतीचे नियोजन खूप आवश्यक असते.  

लंडन हाईड पार्क असो किंवा न्यूयॉर्कचं सेंट्रल पार्क ह्या शहरांचा ‘ग्रीन कव्हर’ त्या त्या शहराच्या क्षेत्रफळाच्या जवळपास निम्म्या आकाराच्या आहेत. शहराची प्रदूषणाची पातळी, राहणीमान यांचे नियोजन करत असताना हे विशेष आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. जास्तीत जास्त ग्रीन कव्हर शहरांसाठी आवश्यक आहे. ते जास्तीत जास्त कसं वाढेल, शहराची हिरवाई जास्तीत जास्त कशी टिकेल आणि वाढेल यासाठी तेथील लोक प्रयत्न करत असतात. त्यातून लोकांचं प्रदूषण विरहित जीवन कसं सुखकर होईल याचा समन्वय घालणं आवश्यक आहे. हाईड पार्क हा त्या दृष्टीने माझ्या सूचीमधील एक आदर्श उदाहरण आहे मला असं वाटतं. 

जगभरात राज्य केल्यानंतर ब्रिटिशांनी जबरदस्तीने किंवा मालकी हक्काने तिथून ज्या वस्तू उचलून नेल्या, त्याचे  एक प्रचंड असं मोठं म्युझियम ‘ब्रिटिश म्युझियम’ म्हणून लंडनमध्ये उभ केले. मी जगभरातली खूप मोठी मोठी आणि महत्त्वाची पॅरिस, लंडन, स्कॉटलंड, तुर्कस्तान म्हणजे ईस्तंबुल या सगळ्या प्रमुख शहरांमधली संग्रहालय पाहिलेत, त्याच्यावर मी सविस्तर लिहिणार आहे. 

पण १७५३ मध्ये स्थापन झालेले लंडनचे म्युझियम हे मला त्या दृष्टीने खूप वेगळे आहे असे वाटते. कारण जगातल्या सगळ्या मौल्यवान वस्तू या तुम्हाला लंडनमध्ये पाहायला मिळतात. मानवी इतिहासाचा वीस लाख वर्षांचा इतिहास आणि लाखो वस्तू या संग्रहालयात आहेत. तीन आणि भारतासह अशिया, इजिप्त अफ्रिका या खंडांमधील वस्तू ब्रिटिशांनी लंडनमध्ये नेऊन या संग्रहालयात जतन केल्या आहेत. आपल्याकडील अशा वस्तू परत मिळवणे किंवा आपल्याकडे आता असलेल्या परंपरागत ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं संग्रहालय करण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे. त्यात लंडनच्या ब्रिटिश म्युझियमप्रमाणे मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. या व्यवस्थापनावर खूप निधी खर्च केला जातो, ज्याची व्यवस्था अतिशय अचूक ठेवली जाते. अशा स्वरूपाची पुणे, मुंबई किंवा दिल्लीसारख्या शहरात जी काही म्युझियम्स आहेत तेथे असे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.  अशा प्रकारे केल्यास प्रकर्षाने मला असं वाटतं की खूप व्यापक पद्धतीने आपल्याला देशातल्या आणि परदेशातल्या नागरिकांच्या पर्यटकांचं आकर्षणाचा केंद्रबिंदू होईल. लंडनमध्ये हे म्युझियम्स पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच आवाक व्हायला होतं. अशा स्वरूपाची भव्यता त्यातल्या वस्तू पाहून आपल्याला लक्षात येईल. 

दुसऱ्या महायुद्धात पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी हिटलरला सडेतोड उत्तर दिलं. लंडनमध्ये त्यावेळी बॉम्ब वर्षाव होत असताना या युद्धाच्या नेतृत्वाची कामगिरी चर्चिलने ज्या बंकरमध्ये बसून केली होती ते बंकर आणि त्याची सर्व व्यवस्था पाहता येते. बकिंगहॅम पॅलेसच्या समोरच या बंकरची आपल्याला जतन करून ठेवलेली एक इमारत दिसून येते. हिटलरने ज्या पद्धतीने युरोपात ज्यूंची कत्तल केली आणि त्याला इंग्लंडने ज्या पद्धतीने हरवलं त्याची आठवण म्हणून या बंकरला ज्यू मोठ्या संख्येने भेट देतात. या बंकरमध्ये चर्चिलने आपल्या वॅार रुमसाठी वापरलेल्या सर्व गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत. त्याच्या टेलिफोन- हॉटलाइन पासून, युद्ध नियोजनासाठी त्याने वापरलेले नकाशे, माहितीचे कागद, त्याच्या राहण्याच्या सर्व सोयी या सगळ्या बाबी जपून ठेवलेल्या आहेत. लोकांना ती पाहताना ऑडिओच्या माध्यमातून त्याची सर्व माहिती आपल्याला इथे उपलब्ध करून दिली जाते.

लंडनचे मला दिसलेले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लंडनची जी स्कायलाइन आहे या प्रमुख वास्तू आहेत, त्यात लंडन टॉवर ब्रिज अशा  प्रमुख गोष्टी ज्या सर्व जगाला माहिती आहेत किंवा बिग बेन सगळ्या जगाला माहिती आहे.  आताच्या काळात त्याच बरोबरीने लंडनआय, श्राड नावाची नवीन काचेची इमारत बनवलेली आहे. थेम्स नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या आणि शहराच्या वैभवात आणि शहराचा दिमाख उंचावण्यात या वास्तू महत्त्वाच्या ठरतात. त्या वास्तूंबद्दल आपल्यासारख्या देशांनी, आपल्यासारख्या नवीन वाढणाऱ्या शहरांनी नक्कीच विचार करणे आणि आता पुढच्या काळात नियोजन कारण आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याकडे शहराची अशी ठोस आणि दिमागदार अशी ठरलेली एकही वास्तू माझ्या पाहण्यात आताच्या काळात नाही. भले ते दिल्ली, मुंबई, पुणे असो किंवा अन्य शहर. आपल्याकडे ज्या मिरवण्याच्या गोष्टी आहेत त्या खूप वर्ष जुन्या आहेत. त्यात आपण स्वतः स्वातंत्र्यानंतर फार मोठी काम केलीत आणि त्यात मोठ्या इमारती वास्तू उभ्या केल्यात असं कधी दिसलं नाही. पॅरिसमध्ये आपल्याला आयफेल टॉवर दिसतो, टोकियोमध्ये टोक्यो टॉवर आहे, शांघायमध्ये शांघाय टॉवर, दुबई मध्ये बुर्ज खलिफा, तैवानमध्ये वन ओवन आहे  अशा पद्धतीच्या ज्या वास्तू आहेत त्या पुणे शहरात उभ्या करू शकलो नाही. त्याचं नियोजन आपल्याला येत्या काळात करणे आवश्यक आहे. अशा इमारती किंवा अशा स्वरूपाच्या रचना झाल्यानंतर त्याच्या सभोवती एक वेगळी पर्यटनाची व्यवस्था निर्माण होते. अनेक आर्थिक केंद्र म्हणून तो भाग विकसित व्हायला मदत होते. त्याच बरोबर ते त्या त्या शहराच्या व्यक्तिमत्त्वाच एक व्हायब्रंट घटक बनतो. आपल्याकडे ते मिसिंग आहे.  

(लेखक सुनील माने हे पुणे येथील माजी पत्रकार आहेत.)

(सर्व छायाचित्रे : सुनील माने)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here