By विजय साखळकर

@maharashtracity

पुण्यात दगडूशेट हलवाई (Shreemant Dagdusheth Halwai) या श्रीमंत गणेशभक्तानं गणेश मंदिराची स्थापना केली. ते मंदिर, त्यातील मूर्ती दगडूशेठ हलवाई गणेशमूर्ती म्हणून ओळखली जाते. एवढेच काय तर या गणेशाच्या आराधनेतील मंत्र जागरातही दगडूशेट हलवाई यांचा नामोल्लेख असतो.

त्याच धर्तीवर मुंबईत माटुंगा (Matunga) पश्चिमेकडे वरदराजन मुदलियार (Varadarajan Mudaliar) याच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात बसविण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती’स ‘वरदाचा गणपती ‘म्हणून ओळखले जात असे. फरक एवढाच की या उत्सवातील मूर्तीचे कायमस्वरुपी मंदिर उभे करण्यात आले नाही आणि गणेशाच्या उपासनेत वरदाचे नाव मंत्रामधून गुंफण्यात आले नाही.

वरदाच्या या गणपतीची अनेक वैशिष्ट्ये होती. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या गणपतीची एकदा स्थापना झाल्यानंतर बारा दिवस उत्सवासाठी उभारलेला मंडप सतत जागता असे. नवीन नवीन विद्युत उपकरणे सजावटीसाठी वापरली जात. मुख्य रस्त्याला लागून असल्याने या उत्सवाचा मंडप नियमित रहदारीला (traffic congestion) अडथळाही आणत असे. मंडपात विविध प्रकारचे जुगार राजरोस खेळले जातं, जे कायद्यास मान्य नव्हते.

दरवर्षी, या गणेशोत्सवाच्या दिवसात होणाऱ्या त्रासाबद्दल विविध शासकीय खात्याकडे जागरूक नागरीक तक्रारी दाखल करीत असत. पण त्यावर फक्त तक्रारदारासोबत चर्चा होत असे. निर्णय घ्यायची प्रत्यक्ष वेळ येईपर्यत अकरा दिवस उलटून जात असत.

वरदाचा गणपती इतर गणपतींसारखा अनंत चतुर्दशीला (Anant Chaturdashi) जागा सोडत नसे. तर दुसऱ्या दिवशी जात असे. अर्थात इथंही रस्त्यावर लोकांची गर्दी असे. वरदाचा गणपती पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होत असे. वरदाचा गणपतीही फार मोठी गर्दी सोबत घेऊन विसर्जित होण्यासाठी जात असे आणि तक्रारीचे काय झाले हे विचारण्यासाठी जाणाऱ्या तक्रारदारांना उत्तरं मिळत असत … गणपती आहे ना… रजेवर आहेत बहुतेकजण… कारवाई करणार कशी?

सन १९८८ मध्ये गो.रा.खैरनार (G R Khairnar) मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे (anti-encroachment department) प्रमुख होते. सन १९८४ मध्ये खैरनार यांनी धारावी (Dharavi), माहीम (Mahim), सायन (Sion) परिसरातील सुमारे ९० छोटेखानी मंदिरांवर कारवाई करून ही मदिरेच नेस्तनाबूत केली होती. (G R Khairnar demolished temples)

या मंदिरात (temples) अमली पदार्थ लपविण्यात (drungs) येत असत असा दावा केला गेला होता. ही मंदिरे फुटपाथ (footpath) अडवून उभी केलेली असल्यानं त्यांचा रहदारीला अडथळा होत असे. या कारवाईनंतर संतप्त समाजकंटकांनी खैरनार यांच्यावर ते माटुंगा येथील पालिकेच्या कार्यालयात जात असताना गोळ्या झाडल्या होत्या. काही दिवस इस्पितळात काढून खैरनार पुन्हा आपल्या कामावर हजर झाले. १९८८ साली त्यांना पदोन्नती मिळाली होती.

वरदराजन मुदलियार आणि पोलीस अधिकारी वाय. सी. उर्फ यादवराव पवार (Y C Pawar) यांच्यातील विळ्याभोपळ्याचे सख्य सर्वपरिचित होते. सन १९८८ साली त्यांनीही वरदाविरोधात कारवाईचा (action against Vardabhai by Y C Pawar) बडगा उगारला होता.

१९८८ सालीच मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवांना दिशा दाखविण्यासाठी ‘सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’ स्थापन करण्यात आली होती. चाफेकर, माहीमकर आदी मंडळी या समितीचे नेतृत्त्व करीत होते आणि ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर (Jayant Salgaonkar) या समितीला मार्गदर्शन करीत होते.

गणेशोत्सववात अप्रत्यक्षरीत्या शिरलेल्या अपप्रवृत्तींचे उच्याटन करणे, ज्या मंडळांना शासकीय यंत्रणेकडून सहकार्य मिळत नसेल त्यांना ते मिळवून देणे, गणेशोत्सवांच्या मिरवणुकीतून चालणाऱ्या रंभासंभा नृत्यांना मनाई करण्यासाठी गणेशोत्सव (Ganesh Festival) कार्यकर्त्यांचे मन वळविणे आणि उत्सवातील एकूण खर्चातील काही रक्कम कला, संस्कृती आदी श्रीगणेशाच्या आवडीच्या गोष्टींसाठी आणि सैनिकी विद्यालयांच्या (military school) स्थापनेसाठी ‘गणेशमहानिधी’कडे देणगी म्हणून द्यावे, अशी उद्दिष्टे या समितीच्या स्थापनेमागे होती.

या समितीकडे वरदाभाईच्या गणपतीची तक्रार दाखल झाली. या तक्रारीची सर्व अंगाने छाननी केल्यानंतर समितीने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. महापालिकेने त्यांना मंडपाचा विस्तार किती असावा, याविषयी हुकूम बजावला होता. वरदाभाईच्या उत्सवास परवानगी नाकारली नव्हती.

त्यावर्षी वरदाचा गणपती छोट्या मंडपात बसला. मंडपात जुगारासारखे खेळ खेळले जाऊ नयेत अशी पोलिसांकडून नोटीस आली होती. शिवाय गस्तही घातली जात होती.

खूप वर्षांनंतर यादवराव पवार यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की वरदाचा गणपती मर्यादेत आणण्यासाठी त्यांनी आणि गो रा खैरनार यांनी परस्परांशी समन्वय सांभाळून कामगिरी केली होती.

वरदाभाईच्या गणपतीचा थाट होता तसाच राहिला. पण मंडपाचा आकार आणि इतर बाबींवर कायमस्वरूपी मर्यादा आल्या.

(विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here