By Dr Abhaykumar Dandage
Twitter : @maharashtracity
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. १६ व १७ मार्च रोजी मराठवाड्यात गारपीट झाल्यामुळे हाता- तोंडाशी आलेला रब्बी पिकांचा घास निसर्गाने हिरावून नेला. सव्वा तास झालेल्या पावसाने व गारपिटीमुळे शेतकऱ्यांना उध्वस्त करून टाकले. या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील ७५०० हेक्टरवरील पिके नेस्तनाबूत झाली आहेत. मराठवाड्यात झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, तसेच त्यांना सरकार योग्य ती मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याचे काम थांबणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना थोडाफार का होईना परंतु दिलासा मिळाला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड , बीड तसेच परभणी जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, गंगाखेड तालुक्यात विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली. वीज पडून चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चौघेजण जखमी झाले. गंगाखेड तालुक्यात उखळी या गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा वीज पडून मृत्यू झाला. बाळासाहेब बाबुराव फड (६० वर्ष ), साडेगाव येथील आबाजी नहातकर (४५ वर्ष) तसेच शेळगाव तालुका सोनपेठ येथील ओमकार भागवत शिंदे या पंधरा वर्षीय मुलाचा वीज पडल्याने मृत्यू झाला. तसेच राहीबाई बाबुराव फड (७५ वर्ष), सतीश सखाराम नरवाडे ( २९ वर्ष), राजेभाऊ किशन नरवाडे (३५ वर्ष) हे जखमी झाले. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात हळदा येथे ज्ञानेश्वर भालेराव या चाळीस वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अचानक पाऊस सुरू झाल्याने जमा केलेले गव्हाचे पीक सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या धावपळीत तो शेतकरी होता.
प्राथमिक अहवालानुसार नांदेड जिल्ह्यात ४७९४ हेक्टरवर तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५२ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या आठवड्यात शुक्रवारी रात्री साडेनऊ नंतर विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. मध्यवर्ती भागासह उपनगरात जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाने रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान केले. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, बारड,अर्धापूर , मुगट या परिसरात गारपीट झाली. तर जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर या तालुक्यातही गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात मोठी गारपीट झाली. त्या ठिकाणी पिंपळदरी, मुखपाट, बाळापुर, अजिंठा शिवारात गारपीट झाल्यावर वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली .
लातूर जिल्ह्यातील रेणापूर, अहमदपूर, उदगीर या भागात चांगलाच पाऊस झाला. शहरात ऊन- पावसाचा खेळ पाहायला मिळाला. अनेक शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे बनीग तयार करून ठेवले होते. त्या भिजल्यामुळे त्यांच्या हातात येणारा पैसा निसर्गाने हिरावून नेला आहे. मराठवाड्यातील काही भागात अद्यापही ढगाळ वातावरण व पावसाचे शिंतोडे पडण्याची भीती असल्यामुळे जसे जमेल तसे गहू, हरभरा काढण्याच्या तयारीला शेतकरी पुन्हा एकदा लागला आहे. हिंगोली जिल्ह्यात गुरुवार व शुक्रवारी सूर्यदर्शन झाले नव्हते. हिंगोली शहरासह जिल्ह्यातील पाचही तालुक्यात काही भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी,औंढा नागनाथ, हिंगोली, वसमत व सेनगाव या पाचही तालुक्यात काही भागात हलका पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली होती. या गारपिटीमुळे ६४ गावे बाधित झाली असून ११ हजार ९ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर ४४०९ हेक्टरवरील बागायती पिके व ६०० हेक्टरवरील जिरायत आणि १३६९ हेक्टरवरील फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या अहवालानुसार एकूण ७४४३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, हरभरा ही पिके पूर्णपणे भुईसपाट झाली आहेत. मोठ्या झाडांच्या फांद्या कोसळल्यामुळे शेतातही वीज पुरवठा खंडित झाला आहे. केळी, आंबा, मोसंबी तसेच द्राक्ष या फळबागानांही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
अलीकडच्या काही वर्षात अवकाळी पाऊस ,गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी तसेच वाढते तापमान यांचा थेट परिणाम शेतीवर झालेला दिसून येत आहे. पारंपारिक शेतीची वर्षानुवर्षाची निश्चित रचना आणि वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. हवामान बदलाने शेतीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. भौगोलिक वैशिष्ट्य लक्षात घेऊन पर्यावरण टिकविणे काळाची गरज आहे. खाण उद्योग, वृक्षतोड, नदीत भराव टाकणे या निर्णयामुळे पर्यावरण संतुलन टिकणे शक्य नाही. मराठवाड्याचे वाळवंटीकरण वेगाने सुरू असल्याचे अनेक जण बोलून दाखवितात, परंतु त्यावर कोणी निरीक्षण नोंदवलेले नाही. या भागात दहा ते पंधरा वर्षात बिकट परिस्थिती निर्माण होईल. दुष्काळ किंवा गारपिटीचे वाढते प्रमाण याचेच उदाहरण असल्याचे पर्यावरण शास्त्रातील तज्ञांचे मत आहे.
(लेखक डॉ. अभयकुमार दांडगे ही नांदेड येथील जेष्ठ पत्रकार आहेत. त्यांना abhaydandage@gmail.com या ईमेल वर संपर्क साधता येईल.)