@maharashtracity
डॉ. मोरेसह सहा जणांची जामीनावर सुटका
बनावट करोना लसीकरण प्रकरण
धुळे: धुळे महापालिकेतील बनावट लसीकरण घोटाळा (Fake corona certificate scam) प्रकरणातील संशयित दोन आरोपींना कारागृहात असताना करोनाची (corona) लागण झाली. या दोघांना विलगीकरणात (isolate) ठेवण्यात आले होते.
शनिवारी सायंकाळी या प्रकरणातील सहा संशयितांची जामीनावर (bail) सुटका झाली. त्यात करोनाग्रस्त दोघांचाही समावेश आहे.
बनावट लसीकरण घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले संशयित आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ. प्रशांत पाटील, उमेश पाटील, अमोल पाथरे व दोन कथीत दलाल नुमान कुरेशी, इमान शेख हे न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) होते. त्यांना शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
दरम्यान, अटकेतील अमोल पाथरे व कथीत दलाल नुमान कुरेशी यांना करोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. ही माहीती कारागृह प्रशासनाने शहर पोलिसांना कळविली. यानंतर शहर पोलिसांनी करोना बाधीतांच्या नातेवाईकांना ती माहीती दिली.
जिल्हा कारागृहात (Dhule Central Jail) असलेल्या डॉ. मोरेंसह सहा जणांना जामीन मंजूर झाल्याने त्यांची शनिवारी सायंकाळी कारागृहातून सुटका झाली. त्यात कोरोनाग्रस्त पाथरे व कुरेशी या दोघांचा समावेश आहे. शिवाय, जामीन दिलेल्या संशयिताना दर शुक्रवारी दुपारी एक ते तीन या वेळेत शहर पोलिसात (Dhule Police) हजेरी लावयचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
दोन्ही डॉक्टरांचे जाबजबाब नोंदविले
या प्रकरणात पोलिसांनी खाजगी डॉ. सर्फराज अन्सारी व महापालिकेच्या नंदीरोड परिसरातील दवाखान्यातील डॉ. मसरुन शेख यांना चौकशीसाठी बोलवले होते. त्यांचे दोन दिवस जाबजबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. या प्रकरणात डॉ. अन्सारी व डॉ. शेख यांचा सहभाग होता किंवा नाही, त्यांनी जबाबात काय माहीती दिली, याचा तपशील अजूनही गुलदस्त्यात आहे.