@maharashtracity
धुळे लाचलूचपत विभागाकडून उलटा सापळा रचून यशस्वी कारवाई
धुळे: पीएचडीचे संशोधन प्रबंधाचे सहामाही प्रगती अहवाल लवकर प्रमाणीत करुन विद्यापीठाला सादर करण्याची परवानगी द्यावी व लवकर पीएचडी पदवी मिळवून देण्यासाठी पीएचडी मार्गदर्शकाला 50 हजारांची लाच दिल्याप्रकरणी एका जिल्हा परिषद शिक्षकाला धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पडकले आहे. (Teacher arrested while giving bribe to PhD guide)
आतापर्यंत लाच घेतल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल होतानाचे आपण पाहीले असेल, परंतू, लाच घेण्याची इच्छा नसताना बळजबरीने मार्गदर्शकाला 50 हजारांची लाच देण्याचा प्रकार घडल्याने हा उलटा सापळा लावल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे (anti-corruption bureau – ACB) उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी दिलेल्या माहीतीनुसार, तक्रारदार यांना बहीणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Jalgaon University), जळगांवकडून एम.फील, पीएच.डी.चे मार्गदशक म्हणुन मान्यता मिळाली आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधनाचे कार्य सुरू आहे. त्यापैकी जिल्हा परिषद शाळेचे (ZP School) प्राथमिक शिक्षक सुकेंद्र किसनराव वळवी यांनी तक्रारदार यांच्या मार्गदर्शनाखाली सन-2015 मध्ये पीएच.डी पदवीकरीता (PhD) विद्यापीठात नोंदणी केली आहे.
विद्यापीठाच्या नियमानुसार आणि संशोधन पध्दतीनुसार अभ्यास करून शोध प्रबंधाचे लेखन करून सहामाही प्रगती अहवाल तक्रारदार यांच्या सहीने सादर करावयाचा असतो. या संशोधन शोध प्रबंधाच्या सहामाही अहवालाचे प्रकरण तक्रारदार यांनी तपासले असता त्या प्रबंधामध्ये काही त्रुटी आढळून आल्यात. त्या दुरुस्त करण्याच्या सूचना मार्गदर्शकाने केल्या होत्या.
परंतू, सुकेंद्र किसन वळवी यांनी तक्रारदार यांना पीएचडीचे संशोधन प्रबंधाचे सहामाही प्रगती अहवाल मार्गदर्शक म्हणुन प्रमाणित करून विद्यापीठास सादर करण्यास परवानगी दयावी व त्यांना लवकर पीएचडी ची पदवी मिळवून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच देऊ केली.
हा प्रकार तक्रारदार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शिक्षक सुकेंद्र वळवी यांच्याविरूदध बळजबरीने लाच देत असल्याबाबत तक्रार दिली.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पथकाने बुधवारी दुपारी नगावबारी चौफली येथील एका हॉटेलवर सापळा लावून शिक्षक सुकेंद्र वळवी यांना तक्रारदार यांना लाचेची रक्कम देतांना रगेहाथ पकडले.
या प्रकरणी वळवीविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलमान्वये पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.