@maharashtracity

धुळे: तालुक्यातील जापी शिवारात मेव्हण्याने शालकाचा धारदार विळ्याने वार करुन निघृणपणे खुन केला. यानंतर या मेव्हण्याने अन्य शालकालाही मारण्याचा प्रयत्न केला. परंतू, प्रसंगावधान राखून दुसरा शालक पळून गेला. यामुळे त्याचा जीव वाचला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. यातील आरोपी काशीराम पावरा हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खूनामागचे कारण समजू शकले नसून पोलीस कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

धुळे (Dhule) तालुक्यातील वणी येथे राहणार्‍या केवलसिंग पावरा याच्या लहान मुलीचे शनिवारी लग्न होते. या विवाह सोहळ्यासाठी केवलसिंगचे भाऊ, बहीण, भाचे, नातेवाईक तसेच मोठा जावई काशीराम चिखल पावरा (रा.पानसामेल, मध्यप्रदेश) हा देखील आलेला होता. लग्न झाल्यावर काशीराम निघुन गेला होता. मात्र रविवारी तो परत आला.

जापी शिवारात केवलसिंग पावराचा भाऊ राहत असून त्याच्याघरी मुक्कामी थांबलेला काशीराम वाद विवाद करीत असल्याने केवलसिंग वणीला परत निघुग गेला. तसेच काशिरामला घेण्यासाठी बुधवारी सकाळी केवलसिंग पावरा याचा मुलगा कुंवरसिंग आणि भाचा राजेंद्र रामसिंग बारेला (वय 32रा.चाळीसगाव जि.जळगाव) हे दोघे आले होते. तिघे जण पायी जात असतांना जापी ते बिलाडी रोडवर युवराज ठाकरे यांच्या शेताजवळ काशिराम याने सोबत आणलेल्या विळ्याने दोघा शालकांवर हल्ला चढवला. त्याने राजेंद्रच्या मानेवर व पोटावर धारधार विळ्याने वार करुन त्याचा खून केला.

यावेळी कुंंवरसिंगलाही तो मारण्याचा प्रयत्नात होता. मात्र तो पळून गेल्याने बचावला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राजेंद्र बारेला याला टाकून काशिराम सुध्दा घटनास्थळावरुन पसार झाला.

या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक व फॉरेन्सिक टिम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तेथील काही पुरावे व अन्य वस्तू जप्त केल्यात. या प्रकरणी तालुका पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here