By विजय साखळकर
@maharashtracity
मन्या सुर्वे याची चकमक (encontrar of Manya Surve) झाल्यानंतर काही दिवसातच त्याचा हाडवैरी माहीमचा सुहास उर्फ पोत्या भाटकर याची चकमक झाली. सुहास भाटकर एका कामगार नेत्याला (Union Leader) मदत करीत होता असे त्याच्या चकमकीनंतर स्पष्ट झाले. पुढच्या दोन वर्षात आणखीही काही चकमकी झाल्या. पण इथपर्यंत मुंबईतील टोळ्यांचा आवाका फार छोटा होता. मुंबईत पठाणी टोळी किंवा करीम लाला (Karim Lala) याच्याखेरीज मुंबई व्यापून उरणारी मोठी टोळी नव्हती.
बहुतेक छोट्या टोळ्या आपापल्या एरियात आपले व्यवहार सांभाळत असत. एकदम खुनाखुनीपर्यंत वेळ आली नव्हती. शिवाय एखाद्या टोळीच्या कार्यक्षेत्रात शिरतेवेळी तेथील टोळीनायकाला भेटून त्याची परवानगी घेण्याची प्रथा पाळली जात असे. यासंबधातील एक किस्सा आहे….
काॅंग्रेस (Congress) पक्षाशी निष्ठा असणारा एक भाई दादरमध्ये राहायचा. त्याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायचा शिवसेनेशी (Shiv Sena) निष्ठा असणारा भाई. शिवसेनेवरच निष्ठा असणारा एक भाई परेल भागात राहायचा. त्याचे काॅंग्रेसनिष्ठ भाईबरोबर बिनसले. तेव्हा त्याने त्याला उचलून नेण्याची परवानगी शिवसेनानिष्ठ भाईकडे मागितली. समोरासमोर राहणाऱ्या या दोन भाईंमध्ये बऱ्याचदा जाहीर तू तू मै मै झाली होती. तरीही परेलवाल्या भाईला त्याच्या मित्रानं सांगितले, हरकत नाही, पण तुझं एकही पोरगं माझ्या बिल्डिंगसमोरून जाता कामा नये..
थोडक्यात उचलून न्यायचं नाही. कारण त्याच्या एरियातून दुसऱ्या कुणीही त्याच्या शत्रूला उचलून नेणं हे त्याला शोभादायक नव्हते. किंवा कुणी असाही निष्कर्ष काढला असता की, तो आवरला जात नव्हता म्हणून त्याला उचलण्याची सुपारी दिली. हे त्याच्या लौकिकाला साजेसं
नव्हते.
याला प्रतिमेची जपणूक करण्याचा अट्टहास म्हणायचा?
पुढे हे दोन्ही भाई मित्र झाले. पण तोपर्यंत नवी पिढी मैदानात आली होती. त्यांचा हैदोसहुल्ला इतका अवास्तव होता की ते एकमेकाकडे पाहिलं म्हणूनही तलवारी काढायचे. जिथे हा किस्सा रंगला त्याच दादर भागात फेरीवाल्यांकडून हप्तावसुली करणाऱ्या चार चार टोळ्या कार्यरत होत्या आणि ते कधीही धांदली करीत. त्यातील पोत्याच्या चकमकीनंतर त्यातील एक टोळी दुसऱ्या टोळीत सामावली गेली.
त्या काळात टोळ्यांचे आर्थिक स्रोत फार थोडे होते. मनमोहन सिंह (Dr Manmohan Singh) यांचे आर्थिक ऊदारीकरणाचे धोरण उशीरा आले. साहजिकच मोठ्या प्रमाणात मोटारी विकत घेण्याचे प्रमाण कमी होते. पण मोटर आणली की मालक ‘महिन्याचे किती?’ ते ठरवून यायचा. अर्थात हे ‘देणे’ गाडी कुणी फोडत असेल तर वाचविण्यासाठी नसायचं, आम्ही न फोडण्यासाठी नसायचं.
एरियातील दारूगुत्तेवाले,-सोशल क्लब्ज, मटका बिटिंग यांच्याकडून सुरक्षा खंडणी वसूल केली जात असे. प्रत्यक्षात खंडणीवसुली किंवा खंडणी (extortion) हा शब्द नंतरच्या काळात प्रचलित झाला. त्याआधी हप्ता आणि हप्तावसुली हे शब्द रूढ होते. बिल्डर्स वाढत गेल्यावर त्यांना सुरक्षा पुरवणं हाही व्यवसाय रूढ होत गेला.
मुंबईत सर्व्रत्र सुरू असणाऱ्या औद्योगिक कंपन्यांतील कामगार संघटनाही आसपासच्या गुंड टोळ्यांची मदत संप फोडला जाऊ नये यासाठी घेत. तर काही कंपन्या संप फोडण्यासाठी या टोळ्यांची मदत घेत. याबदल्यात टोळीनायकाकडून शिफारस केलेल्या व्यक्तींना कामगार म्हणून कंपनीत सामावून घेतले जात असे. लोडिंग अनलोडिंग वेळी गुंडांकडून त्रास होऊ नये म्हणूनही कंपन्या या टोळ्यांची मदत घेत.
अशा रीतीने काम करणाऱ्या मुंबईत असंख्य छोट्या छोट्या टोळ्या होत्या. मालमत्ता खरेदी-विक्री व्यवसायात असणाऱ्या दलालांकडून मिळणारी बिदागीही या टोळ्यांना मिळत असे. कारण हे सर्व व्यवहार काळे-पांढरे या स्वरुपात चालायचे आणि ही रक्कम विशीष्ट ठिकाणी पोहचवण्यासाठी खात्रीची माणसे लागत.
(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)