@maharashtracity
धुळे: धुळे (Dhule) तालुक्यातील बोरविहीरच्या जंगलात गळफास देत एका आदीवासी महिलेचा निघृण खून (murder) केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पथकाने धाव घेत तपास सुरु केला.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, आज दि ६ रोजी सकाळी बोरविहीर गावातील काही लोकांना गावाजवळील जंगलात एक महिला झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसली. त्या महिलेचा चेहरा दगडाने ठेचलेला होता. त्यामुळे एकच घबराट पसरली.
गावातील सामाजिक कार्यकर्ते किरण ठाकरे यांनी तत्काळ याची माहिती तालुका पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पीएसआय के पी चौधरी, पो ना जितेंद्र सोनार, एस आर जावरे, पो कॉ वानखेडे, पो कॉ अमोल कापसे, राकेश शिरसाठ घटनास्थळी रवाना झाले.
मयत महिला जंगलातील तलावाजवळ एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. तिच्या पेहरावावरुन ती आदिवासी असल्याचा पोलिसांचा कयास आहे. अंदाजे ३५ वर्षे वयाच्या या महिलेला अज्ञात व्यक्तीने ठार मारुन आत्महत्येचा बनाव करण्यासाठी साडीच्या सहाय्याने झाडाला लटकवले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
घटनास्थळी काही वस्तुही पोलिसांनी हस्तगत केल्या. तसेच अधिक माहिती काढण्यासाठी श्वान पथकासह, फॉरेसिंक एक्सपर्ट देखील मागवण्यात आले. पंचनामा करुन मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रवाना केला. तसेच अधिक तपास सुरु केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरु होते.