By विजय साखळकर
@maharashtracity
मुंबई: मस्तान तस्करीत (smuggling by Haji Mastan) गुंतत गेल्यावर त्याचे अनेक बड्या लोकांशी संपर्क येत गेले आणि त्यांची गाढी दोस्ती होत गेली. पण कोचीनहून मुंबईत आलेला आणि स्थिरावलेला मस्तान अवतीभवती वावरणाऱ्या माणसांची अचूक पारख करायला शिकला होता.
तो कमालीचा दैववादी होता. मुसाफिरखाना येथे बाहेर रस्त्यावर झोपायचा त्यावेळी जमवलेला पैसा साठवलेलं मडकं उशाशी ठेवून झोपायचा. त्यावेळी त्याचे मित्र त्याला नेहमी बजावायचे, अरे बाबा इकडे हजार लोक आजूबाजूला वावरत असतात. तू झोपलेला असताना कुणी यातली रक्कम पळवली तर…?
समोरच्या स्टाॅलकडे बोट दाखवून मस्तान म्हणायचा….. दिवसभर ते त्या स्टाॅलच्या वर असतं. पण गेलं नाही कधी…. आखीर… जेब मे है, कोई ले जा सकता है… साथ मे! है कोई चुरा सकता है…. हाथ मे है कोई छीन सकता है….. लेकिन… (कपाळावरून हात फिरवून दाखवत….) जो यहा लिखा है कोई डरा धमकाकर भी नही ले जा सकता है…
मस्तान कदाचित यामुळेच माणसं वाचायला शिकला असावा. तो एखाद्याला पारखून घ्यायचा. असा की तो कायम त्याचा व्हायचा. मस्तान ज्या बाॅम्बे गॅरेजला बसून असायचा तिथं दीपक भाटिया नावाचा एक तरूण पोरगा येत असे. तो यायचा भंगारातील एखादी मोटर उचलून आणायचा आणि ती पाॅश होईपर्यंत रोज येऊन मोटरची दुरुस्ती आणि रंगरंगोटी पाहत राहायचा…..
एके दिवशी स्वत: मस्ताननं त्याला बोलावलं आणि म्हटलं, तुम्हारे लिये एक ऑफिस तय्यार है… चावी अभी ले जा सकता है…..असं म्हणून त्यानं त्या तरूणाला भांबावून सोडलं.
ठीक है लेकिन डिपाॅझीट (त्यावेळी पागडी पद्धती होती) महिने का भाडा सब तो परवडना चाहिए… आखीर इतनी मेहरबानी आप क्यों कर रहे है… दीपक भाटिया व्यावहारिक बोलू लागला.
मस्ताननं त्याला सांगितलं….. देख डिपाॅझीट कुछ नही.. लेकिन तुम्हारे लिये सीरफ…और भाडा बोलेगा तो तू जो देगा…मै मांगूगा नही…
झालं… दीपक भाटिया यांचं ऑफिस तयार झालं. ते तिथं बसू लागले. त्यांचा व्यवसाय सुरू झाला. वाढू लागला. पण त्याच वेळी त्यांच्या मनात विचार येत राहिला …ना आपली ओळख ना पाळख.. एवढा मोठा माणूस येतो आणि आपणहून ऑफिस देतो, हा काय प्रकार आहे……. काही दिवसांनी ते रहस्य उलगडत गेलं….
स्वत: दीपक भाटिया यांनी ही कथा मला आणि राजेंन्द्र शिखरे यांना सांगितली होती. त्यावेळी आमचा ‘अनवाॅंटेड हिरोज…’ हा प्रोजेक्ट सुरू होता. दुर्दैवाने तो प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकला नाही.
तर मस्तान या तरुण पोराला नेहमी पाहायचा… तो मोटर दुरुस्तीसाठी आणल्यापासून अत्यंत भक्तिभावानं जवळ थांबून राहायचा. मस्ताननं तेव्हापासून आपल्या लोकांना या पोराची माहिती काढण्यास सांगितले.
मस्तानकडे माहिती येत गेली. कौटुंबीक स्थितीही त्यात त्यानं तपासली होती. मग त्यावर त्यांनं काही निष्कर्ष काढले आणि भाटियांना गॅरेजच्या इमारतीतच मागच्या बाजूला असणा-या एका कॅबीनचा ताबा देऊन टाकला.
मस्ताननंच पुढे कधीतरी त्यांना हकिकत कथन केली…
कौटुंबीक पार्श्र्वभूमी लक्षात घेतल्यावर व मस्तानकडे जमा झालेल्या माहितीवरून मस्ताननं निष्कर्ष बांधला व तो अचूक ठरला..
या तरुण पोराला ऑटोमोबाईल इंजिनिअर व्हायचं होतं. पण हे महागडं शिक्षण घेण्याइतकी श्रीमंती त्यांच्यापाशी नव्हती. तेव्हा त्यांनी ही नवी पद्धत शोधली.. भंगारातली भंगार म्हणून काढली गेलेली मोटर तो तरुण फुटकळ भावाने खरेदी करायचा. तिचं नूतनीकरण करण्यासाठी खर्च करीत असायचा. नूतनीकरण होतावेळी तो समक्ष उपस्थित राहायचा. त्यामुळे त्याला मोटारीची आतील रचना उमगत असे.
हा त्याचा ऑटोमोबाईल इंजिनियरिंगचा अभ्यास असायचा. पुढे रंगरंगोटी केलेल्या या मोटारीतून जे उत्पन्न मिळायचं ते तो गाठीला बांधून काही तरी बनण्याचं त्याचं स्वप्न होतं.
मस्ताननं ते अचूक ओळखलं आणि त्याला ते स्वप्न साकार करण्यासाठी मदत केली.
या बाॅम्बे गॅरेजच्या दर्शनी भागात मस्तान खुर्च्या टाकून मित्रमंडळींसह बसायचा. तिथं बहुतेकदा प्रख्यात निर्माते शक्ती सामंताही असतं. इथंच मन्नुभाई नावाचा मस्तानचा मित्र असायचा. तिथं येणाऱ्या गीतकारानं मन्नुभाईवर एक गाणं लिहिलं होतं…. ‘मन्नुभाई मोटर चले पम पम पम…..
एके दिवशी मस्ताननं दीपकला सांगितलं…. गॅरेजमागे शक्ती सामंताला त्याच्या भागिदारीत सिनेमा थिएटर त्याला काढायचे होते आणि त्यासाठी त्याला दीपक भाटियांना दिलेली जागा परत हवी होती. आता स्वत: जागा घेण्याची ऐपत असल्यानं जागा कधी खाली करायची असा लकडा दीपक यांनीच चालवला होता.
एक दिवशी मस्ताननंच सांगितलं…. अब जरूरत नही रही… म्युनिसिपल कानूननुसार कार पार्किंग के लिये जगह चाहिये उतनी जगह पिछे नही है… इसलिये….. अब तुम्हारा जगह तुम्हारा .…..हमारा थिएटर हमारे जेब मे…..