By विजय साखळकर
@maharashtracity
मस्तानला तस्करीत अखेर ओढणं भाग पडलं. हुसेन तालानं त्याची हमी घेतली आणि मस्तानची (Haji Mastan) कारकीर्द सुरू झाली. समुद्रात चांदी देऊन सोनं घेण्याच्या अटीतूनही त्याला वगळण्यात आलं. कारण हुसेन तालानं त्याची हमी घेतली होती. ताला अरब अमिरातीतच (UAE) शिफ्ट झाला होता. शिवाय त्याची यंत्रणाही त्यानं मस्तानच्या दिमतीला दिली होती.
मस्तानचा लौकिक वाढत होता तशी त्याच्याविषयीची उत्कंठाही वाढत चालली होती. त्याला आता गोदीत काम करावे लागत नव्हते किंवा बोटींची धुराडी साफ करण्याची गरज उरली नव्हती. दिल्या शब्दाला तो जागला होता आणि पहिल्या डिलिव्हरीचे धन दुस-या डिलिव्हरीच्या वेळी त्यानं चुकते केल्यामुळे त्याच्या शब्दाला वजन निर्माण झाले होते.
मस्तान ‘गोदी का चूहा’ म्हणून ओळखला जात असताना त्यानं आपल्या गमतीदार बोलण्यातून आणि मैत्रीतील जिव्हाळ्यातून अनेक माणसं गोळा केली होती. त्याच्या पुढील काळासाठी ती मंडळी त्याच्यासाठी राबायला तयार होती.
‘कल से और एक कूली हप्ता देने से इन्कार करेंगा..’ आदी डायलाॅग सिनेमासाठी ठीक पण तशा प्रकारचा हप्ता घेतला जात असल्याचा उल्लेख मिळत नाही. मस्तानच्या मुलाखतीमधूनही असं काही सापडत नाही. हप्तावसुली करणाऱ्यांवर गोदीतील कामगारांनी हल्ला केल्याचे आढळत नाही.
त्यावेळी वसुली होत असे पण ती गोदीत हमाल पुरविणाऱ्या कंत्राटदारांकडून होत असे. कारण पगार आठवड्याला व्हायचा आणि त्यातील काही भाग ठरल्यानुसार कंत्राटदाराला द्यावा लागे. बिल्ला मिळेपर्यंंत ही वसुली होत असायची, असे त्या वेळेचे जाणकार सांगतात.
मस्तानच्या एकूण कारकिर्दीत अत्यंत गमतीदार आणि रंजक किस्से घडल्याचे मात्र नमूद आहे.
मस्तानचे काही धष्टपुष्ट कॅरियर (carrier of Mastan) एका कारमधून माल घेऊन चालले होते. पण त्यांना साध्या वेषातील एका हवालदाराने (Police) अडविले. तपासणी करायला सुरुवात केल्यानंतर मस्तानच्या लोकांनी विरोध केला म्हणून त्या हवालदाराने गाडीबरोबर असणाऱ्या सर्व कॅरियरना एकट्याने बदडले आणि माल घेऊन पसार झाला.
कॅरियर्सनी हताश होऊन हकिकत मस्तानला सांगितल्यावर मस्तानने आपल्य सर्व बातमीदारांना या कामी जुंपले. त्यांनी
सात- आठ दिवसाच्या मेहनतीनंतर त्या हवालदाराची कामाची वेळ आणि पोलीस ठाण्याचा पत्ता शोधला.
त्यानंतर मस्तानने पोलीस ठाण्यात सिनियर समोर त्या हवालदारा बोलावले आणि त्याला बजावले.
“मेरे छे छे तगडे लोगों को मारपिटकर तूने बाबा का सोना तो लूटा है”…’मस्तानचे हे शब्द ऐकताच तो हवालदार लट लट कापू लागला. थातूर मातूर बोलून खिंड लढवू लागला. पुढे काय होणार याचा अंदाज त्याला येऊ लागला. पण त्याला अडवत मस्तानने सा़गितले, “मै तुम्हारी दाद देता हूं| अकेले तूने मेरे छे छे तगडे आदमियों को घास खिलाया…दाद देता हूं मै…. हाजम करो मेरा सोना.. लेकिन इतना तो बताओ आखीरकार यह जान की बाजी लगाई क्यो?
‘मेरी लडकी की शादी है इसलीये…..’
“जाओ माफ किया धूमधाम से शादी मनाओ| कब है शादी?”
मस्तान त्या लग्नालाही हजर राहिला होता.
मस्तानचे असे माणुसकी दाखविणारे किस्से खूप ऐकायला मिळतत. चेन्नईत राहणा-या एका कुरियरचाही किस्सा प्रसिद्ध आहे.
(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)