@maharashtracity
By विजय साखळकर
अब्दुल करीम शेरखान याच्या जीवनाविषयी जसं आज सर्वसामान्य माणसाला फार औत्सुक्य वाटतं, तसंच सिनेमा निर्मात्यांनाही वाटत होतं. त्यामुळे अनेक चित्रपटांतून करीमलालाच्या (Karimlala) जीवनातील लहानमोठ्या प्रसंगाचे दर्शन घडते. ‘दादा’ हा चित्रपट त्याची मध्यवर्ती भूमिका ठेवून काढण्यात आला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत चाचपडणा-या अमिताभ बच्चनसाठी (Amitabh Bachchan) संजीवनी ठरलेला ‘जंजीर’ (Zanjeer) या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका प्राणनं (Pran) रंगवली होती. भूमिकेचं नाव होतं……. शेरखान.
शेरखान हा गुंड होता. पण उसूलोंका बादशहा होता. ‘यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी’ हे गाणं या व्यक्तिरेखेच्या तोंडी होतं. हे गाणं आणि ही व्यक्तिरेखा त्या काळी लोकप्रिय ठरली होती. करीमलालाच्या जीवनाशी ही व्यक्तिरेखा जुळणारी होती.
हे दोन चित्रपट अत्यंत महत्त्वाचे होते. याखेरीज इतर अनेक चित्रपटांतून करीमलालासारखी व्यक्तिरेखा पाहायला मिळते. असं म्हणतात की प्रख्यात चरित्र अभिनेता आणि पटकथा-संवादलेखक कादर खान (Kadar Khan) यांनी त्यांच्या लेखनातून करीमलालाला जुळेल असा खलनायक चितारला होता. करीमलालाशी इतरही अनेक पटकथालेखक – संवादलेखक
जोडले गेले होते. त्यांना त्यांच्या कलाकृतीतून जी व्यक्तिरेखा चितारायची असे तिचा कच्चा माल करीमलालाकडे मिळे…
करीमलालाची व्यक्तिरेखा अनेक निर्मात्यांनी आपल्या चित्रपटात घेतली असली तरी हाजी मस्तान (Haji Mastan) किंवा अन्य तस्करांप्रमाणे तो सहसा त्यांच्या पार्ट्यांतून दिसत नसे. त्याचा कारभार स्वतंत्र असे. नागपाड्यात त्याच्या मालकीचं एक हाॅटेल होतं. पण तो स्वत: गल्ल्यावर बसत नसे. हजला जाऊन आल्यावर तो पैशांना स्पर्श करीत नसे. कारण इस्लाममध्येच (Islam) तसं नमूद आहे. हाजयात्रा केल्यावर समाजातील त्या माणसाचा दर्जा वाढतो. त्यामुळे पैशाशी संबंधित व्यवहारात हाजी (हाजी म्हणजे हजयात्रा करून आलेला) लक्ष घालत नसतो.
करीमलालाचे सर्व आर्थिक व्यवहार त्याचा भाऊ रहीमलाला आणि त्याची मुलं सांभाळत असत. त्या तिघांच्या पश्चात त्याच्या मुलीचा नवरा सारे व्यवहार सांभाळत असे.
गुन्हेगारीवर लेखन करणाऱ्या अनेकांनी हाजी मस्तान यांनी मुंबईचा किनारा आणि दैशाचा किनारा वाटून घेतल्याचं नमूद केलं होतं. पण तसं काही झाल्याचा निश्चित पुरावा मिळत नाही. कारण देशाचा किनारा फार मोठा होता आणि आहे. किनारा सोयीचा पाहून माल उतरविला जात असे.
मुंबई (Mumbai) किनारा हा तस्करी माल उतरविण्यासाठी हाजी मस्तानला सोयीचा वाटला. गोव्याच्या (Goa) किना-यावर गोव्याच्या राजकारणात अग्रेसर असणारे एक ख्रिश्चन कुटुंब तस्करी करीत असायचे. दमणला, गोव्याला सुकर नारन बखिया आणि लल्लू जोगी तस्करी करीत असत. नंतर दोघं वेगळे झाले. स्वतंत्रपणे कारभार चालवू लागले. आणखीही सिनेमाशी संबंधित मंडळी तस्करी करीत.
हाजी मस्तान यानं करीमलालाच्या मदतीने एक असे संघटन तयार केले, ज्यामुळे खंडप्राय वाटणा-या मुंबईतून अन्य ठिकाणी पाठविण्याचा तस्करी माल सुरक्षितरीत्या पाठविणं शक्य होतं.
किना-यावर माल उतरल्यांनंतर तो त्वरेने सुरक्षित जागी हलवणं गरजेचं असे. ही वाहतूक ट्रक किंवा अन्य वाहनांतून हलवली जायची. पण मुंबईच्या गल्ल्लोगल्ली असणा-या छोट्या-मोठ्या गुंड टोळ्यांना याची पुसटशी खबर जरी मिळाली तरी तात्काळ या गाड्या अडवून लुटल्या जात. त्यामुळे माल लुटला जाऊ नये म्हणून मुंबईतील गुंड टोळ्यांना तनखा सुरू करण्याचा शिरस्ता या दोघांनी काढला. परिणामस्वरूप हाजी मस्तानची तस्करी साॅफ्ट होत गेली.
नव्या यंत्रणेत असे ठरले की, या मशहूर टोळीनायकांनी तस्करीच्या मालाची डिलिव्हरी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेखाली नियोजित जागी पोहोचावयाची. त्यामुळे लुटीची शक्यता जवळपास शून्यावर आली. यालाच एरिया वाटून घेतला असं म्हणायचं का??
(पुढच्या भागात अंडरवर्ल्ड मधील पहिली गोळी)
(लेखक विजय साखळकर हे वरिष्ठ पत्रकार असून त्यांनी गुन्हेगारी क्षेत्रात अनेक वर्षे वार्तांकन केले आहे.)