@maharashtracity
धुळे: धुळे (Dhule) तालुक्यातील निमखेडी गावात कुस्त्यांच्या दंगलीवेळी (wrestling competition) झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी होवून चाकू, दांडक्याने मारहाण केली गेली. यावेळी गावठी कट्ट्याने हवेत गोळीबार करुन दहशत माजवण्याचा प्रकारही घडला. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत निमखेडी गावाचे सरपंच उमेश उत्तम मोरे (वय २४) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ४ रोजी निमखेडी गावात सकाळी ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास गावात कुस्त्यांच्या कारणातून वाद झाले. यावेळी संदीप मोरे रा. फागणे, आबा पवार, शाहरुख पवार, सनी बबन बैसाणे व इतर ३ ते ४ जण यांनी संगनमत करीत चाकू, गावठी कट्टा, लोखंडी रॉंड, लाकडी दांड याच्या सहाय्याने हल्ला केला. यात चाकूने वार करण्यात आले.
या हल्ल्यात सरपंच उमेश मोरे, विलास बळीराम पगारे हे दोघे जबर जखमी झाले आहेत. तसेच शाहरुख पवार याने त्याच्या हातातील लोखंडी हत्याराने वार केला. आबा पवार याने गावठी कट्टा काढून हवेत फायर केला. यावरुन संदीप मोरे रा. फागणे, आबा पवार, शाहरुख पवार, सनी बबन बैसाणे व इतर ३ ते ४ जण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरी फिर्याद संदीप नामदेव मोरे (वय ३०) रा. फागणे, ता.धुळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ४ रोजी निमखेडी गावात विर एकलव्य पुतळ्याजवळ रंगनाथ रतन ठाकरे, भटू रंगनाथ ठाकरे, भरत जाधव, अनिल हिरामण भिल सर्व रा. निमखेडी यांनी संगनमत करुन त्याच्या समाजात आग लावण्याचे काम करतो, या कारणावरुन, संदीप मोरे याच्याशी भांडण करुन हातात लाठ्या काठ्या लोखंडी रॉड घेवून शिवीगाळ करीत मारहाण सुरु केली.
रंगनाथ ठाकरे याने हातातील चाकूने एकावर वार करुन गंभीर दुखापत केली. अनिल भिल याने हातातील गावठी कट्टयातून गोळी झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावरुन रंगनाथ रतन ठाकरे, भटू रंगनाथ ठाकरे, भरत जाधव, अनिल हिरामण भिल सर्व रा.निमखेडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.