@maharashtracity
धुळे: दिल्लीहून मुंबईकडे जाणारा एक कोटी 30 लाख रुपयांचा गुटखा धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या म्हणजेच एलसीबीच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गारील पुरमेपाडा शिवारात पकडला. या प्रकरणी परप्रांतातील पाच जणांंना ताब्यात घेण्यात आले असून एक कोटी 30 लाखांच्या गुटख्यासह साठ लाख रुपयांचे कंटेनर, मोबाईल, असा एकूण एक कोटी 90 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दिल्लीहून मुंबईकडे महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यानुसार बुधवंत यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, हे.कॉ.रफिक पठाण, पो.ना.गौतम सपकाळे, पो.ना.राहूल सानप, प्रकाश सोनार, संदीप सरग, कैलास महाजन यांच्या पथकाला कंटेनर क्र.एन.एल.01/ए.सी.8097, एच.आर.55/ए.ई.3177, एच.आर.38/डब्ल्यू 3283 व एच.आर.38/वाय 9640 हे चारही कंटेनर आर्वी शिवारातील पुरमेपाडा गावाजवळ एका मागोमाग जात असताना आढळून आले.
पथकाने कंटेनर थांबवून ते मोहाडी पोलीस ठाण्यात आणले. तेथे या कंटेनरची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला फोर स्टार गुटखा व एसएचके सुगंधीत पानमसाला तंबाखु आढळून आला. यावेळी पोलिसांनी एक कोटी 30 लाख 49 हजार 280 रूपये किंमतीचा गुटखा, 60 लाख रुपयांचे चार कंटेनर, 25 हजाराचे पाच मोबाईल, असा एकूण एक कोटी 90 लाख 74 हजार 280 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शिवाय कंटेनर चालक साबीर मजिद खान रा.घासेरा हरियाणा, शकिल अहमद लियाकत अली रा.भडांगाका जि.नुहू हरियाणा, रूकमोद्दीन अयुब खान रा. हिरवाडी जि. नुहू हरियाणा, नसीम खान अली मोहम्मद खान रा.अलीगढ व मुसरलिम रुजदार रा.सोमकी, जि.भरतपूर अशा पाच जणांना ताब्यातही घेतले. या प्रकरणी एलसीबीचे पो.ना.गौतम सपकाळे यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिसात पाचही जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला.