चौघा विरोधात गुन्हा दाखल
@maharashtracity
महाड (रायगड): कंपनीच्या व्यवसायातून मिळालेली सुमारे ८८ लाख रुपयांची रक्कम कंपनीच्या संचालकांच्या संमतीशिवाय बनावट बँक खाते उघडून आपल्या स्वतःच्या बँक खात्यात वळविणाऱ्या तीन भामट्यांसह बँक व्यवस्थापकाविरोधात महाड शहर पोलीस (Mahad Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ए. के. आर. इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मंगेश रामचंद्र शितोळे (रा. तळेगाव दाभाडे, पुणे ), प्रथमेश मनोहर शिगवण (राहणार डोंबिवली), निलेश भारती व मानसी शितोळे (राहणार तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात अपहार व फसवणुकीचा गुन्हा (cheating case) दाखल करण्यात आला आहे.
मंगेश शितोळे हे या कंपनीमध्ये मुख्य व्यवस्थापक पदावर काम करीत होते. या पदाचा गैरफायदा घेऊन त्यांनी महाड शहरातील आय. डी. बी. आय बँकेचे (IDBI bank) व्यवस्थापक प्रथमेश शिगवण यांना निलेश भारती यांच्या मदतीने बँक खाते उघडण्यासाठी पैसे दिले आणि कंपनीच्या संचालकांच्या संमतीशिवाय ए के आर कंपनीचे बँक खाते उघडले. तसेच कंपनीच्या संचालकांची बनावट कागदपत्रे, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) व कॅनरा बँकेची (Canara Bank) बनावट ना हरकत दाखले तयार करून या कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीरपणे बनावट खाते आयडीबीआय बँकेत उघडले.
कंपनीच्या व्यवसायातून मिळालेली ८७ लाख ७९ हजार ५३ रुपयांची रक्कम कंपनी संचालकांच्या परवानगीशिवाय परस्पर या बनावट बँक खात्यामध्ये जमा केली. यानंतर ही रक्कम रोखीने व वैयक्तिक बँक खात्यामध्ये मंगेश, निलेश व मानसी या तिघांनी परस्पर वळवून काढून घेतली. ७ मार्च २०२० ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये हा प्रकार घडला होता.
कंपनीचे मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनी मालकांनी याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) तक्रार नोंदवलेली होती. यानंतर वरिष्ठ कार्यालयाच्या अर्जानुसार आज रविवारी ६ मार्चला महाड शहर पोलिस ठाण्यामध्ये या चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.