@maharashtracity

श्वानपथकासह शेकडो पोलीस आदिस्ते गावात दाखल

महाड (रायगड): महाड तालुक्यातील आदिस्ते गावातील महिला सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे यांचा मृतदेह सोमवारी दुपारी उबटवाडी आदिस्ते या दरम्यान आढळल्याने महाड तालुक्यात खळबळ उडाली आहे. मयत मीनाक्षी खिडबीडे यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने पोलीस तपास यंत्रणा कामाला लागली असली तरी महाड तालुका पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

आदीस्ते गावाच्या सरपंच मीनाक्षी खिडबीडे या दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सरपणाची लाकडे गोळा करण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. दुपारी दोन वाजेच्या सुमारास रस्त्यापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर मीनाक्षी यांचा मृतदेह विवस्त्रावस्थेत दिसून आला.

या घटनेने संपूर्ण महाड तालुका हादरून गेला आहे. मयत मीनाक्षी खिडबिडे यांचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन (Post Mortem) करण्यासाठी आणला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी हा मृतदेह मुंबई येथे न्यायवैद्यक तपासणीकरिता नेण्यात आला.

मयत मीनाक्षी खिडबिडे यांचा खून का झाला याबाबत सर्वत्र चर्चा सुरु असून आहे. या मयत महिलेच्या खुनाबरोबरच तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विवस्त्रावस्थेत मृतदेह दिसून आल्याने खुनी नेमके कुठले आहेत आणि खुनाचे कारण काय याचे गूढ कायम आहे.

या खुनाच्या तपासाकरिता अलिबाग येथून श्वानपथक (dog squad) तातडीने दाखल झाले. मात्र या श्वानपथकाच्या तपासात काहीच साध्य झाले नाही. याशिवाय याठिकाणी पडलेल्या लाकडांवरील बोटांचे ठसे घेण्यात आले आहेत.

घटना घडल्यानंतर पालकमंत्री आदिती तटकरे (Gaurdian Minister Aditi Tatkare), आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogawale), पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांनी धाव घेतली.

या प्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नसून शेकडो पोलीस आदिस्ते गावात दाखल झाले आहेत. याप्रकरणी महाड तालुका पोलिसांनी अद्यात आरोपींविरोधात ३०२, ३७६, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील पहिलीच घटना

आदिस्ते गावात झालेल्या महिला सरपंचाच्या (Sarpanch) खुनाची महाड तालुक्यातील हि पहिलीच घटना आहे. ही महिला हि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून (NCP) सरपंच म्हणून निवडून आली होती. यामुळे या खुनामागे राजकीय वाद आहे का? याबाबत शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत.

खून प्रकरणामुले महाड तालुका पोलीस ठाण्यासह रायगड (Raigad Police) जिल्ह्यातील विविध पोलीस यंत्रणा तपास कामी महाड मध्ये दाखल झाल्या आहेत. एक महिला सरपंच आणि एका विशिष्ट पक्षाची सरपंच यामुळे ज्या प्रकारे खून होताच पोलीस यंत्रणा कामाला लागली त्याचप्रमाणे या खुनाचा उलगडा पोलीस यंत्रणा करेल का?

या अगोदर महाड तालुक्यात अशाच प्रकारे खुनाच्या घटना घडल्या आहेत. वर्षानुवर्षे फक्त त्याचे तपासच होत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा या खुनाचा लवकरात लवकर उलगडा करेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here