@maharashtracity
धुळे: धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारात चौघांना ५ किलो अफुच्या बोंडासह रंगेहाथ पकडले. ही कारवाई ८ रोजी रात्री ८.५० च्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक संदिप सरग यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धुळे-सुरत महामार्गावर कुसुंबा शिवारात अफुची हेराफेरी होत असल्याची खबर मिळाल्याने काल गुरुवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुसुंबा गावापासून २ किमी अंतरावर ज्ञानेश्वर फॉडेशन जवळ सापळा लावला.
या ठिकाणी एका महिंद्रा झायलो कार क्र. एमएच ०४-इ एस १९९७ यात बसून दोघे जण आले. तसेच दोन मोटरसायकलवर बसून काही जण माल घेण्यासाठी आले. त्याचवेळी पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. चौघांना पकडण्यात यश आले, तर दोधे पसार झाले. यावेळी ५ किलो १५० ग्रॅम वजनाचा मानवी मेंदूवर परिणाम करणारा अमंली पदार्थ अफूची सुकलेली बोेंडे एका पांढर्या रंगाच्या गोणीत भरलेली पोलिसांना कारमध्ये मिळून आली. प्रती किलो ७ हजार याप्रमाणे एकुण ३६ हजार ५० रुपयांची ही अफू हस्तगत केली गेली. तसेच ४ लाखाची कार, ४० -४० हजाराच्या दोन मोटरसायकल, बलदेवसिंग चरणजितसिंग पन्नो याच्या कडील १२ हजार ५८० रुपयांची रोख रक्कम, ३ मोबाईल फोन असा एकुण ५ लाख ४९ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल यावेळी पेालिसांनी जप्त केला.
याप्रकरणी बलदेवसिंग चरणसिंग पन्नो (५०) रा.तरसाली, बडोदा गुजरात, ह.मु. न्यु सतलज हॉटेल बोरकीखडी पुढे दहिवेल ता.साक्री, रघुनाथ भोमा राठोड (३५) रा.सातरपाडा ता.साक्री, ज्ञानेश्वर गोविंदा माळी (वय ५०) रा.विठ्ठल मंदिराजवळ, दहिवेल, सागर हिरामण बागुल (वय १६) रा.गुलतारा पो देवजीपाडा ता.साक्री या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिघांना अटक केली आहे. तसेच भिलाटी रमेश बागुल रा.गुलतारा पो देवजीपाडा, चेतन पाटील रा.गोताणे आणि चेतन पाटीलचा एक मित्र हे तिघे जण फरार झाले आहेत. या ६ जणांच्या विरुध्द तालुका पोलिस ठाण्यात एनपीडीए ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.