@maharashtracity
रोकडसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
धुळे: शिंदखेड्यात स्टेट बँकेचे एटीएम (SBI ATM) फोडून सुमारे 37 लाखांची रोकड लांबविणार्या हरियाणामधील (Haryana) चोरांच्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. तर अन्य तिघांचा शोध सुरु आहे.
चोरट्यांकडून तीन लाखांची रोकड, मोटार, असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही टोळी जेरबंद झाल्याने चोपडा, जळगाव (Jalgaon) येथील एटीएम चोरीच्या संभाव्य घटनांना आळा बसला असून या टोळीने राजस्थान (Rajasthan), कर्नाटक (Karnataka), हरियाणा, पश्चिम बंगाल (West Bengal), महाराष्ट्र (Maharashtra) या राज्यांमध्ये गंभीर स्वरुपाचेे गुन्हे केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी दिली.
शिंदखेड्याच्या एटीएम प्रकरणाच्या उलगड्याची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व पथ्कातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अधीक्षक पाटील यांनी सांगितले की, दि.12 नोव्हेंबर रोजी शिंदखेडा गावातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोरील एटीएम गॅस कटरच्या मदतीने फोडून चोरट्यांनी 36 लाख 86 हजार 35 रुपये लंपास केले होते. विशेष म्हणजे या चोरीची माहिती तिसर्या दिवशी समोर आली.
यानंतर दि.14 रोजी एसबीआयचे उपव्यवस्थापक अविनाश पगारे यांनी शिंदखेडा पोलिसात जावून एटीएम फोडल्या प्रकरणी फिर्याद दिली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बुधवंत व त्यांच्या पथकाने तपास केला.
त्यावेळी चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरच्या मदतीने फोडले. तेथील सीसीटीव्ही कॅमेर्यात चेहरा दिसू नये, याकरीता त्या कॅमेर्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारुन चेहरा कपड्याने झाकल्याची माहिती समोर आली.
या प्रकरणातील आरोपी मध्यप्रदेशातील नेवाली-खेतीया, शहादा-दोंडाईचा मार्गाने शिंदखेड्यात आले. गुन्हा केल्यानंतर त्याच मार्गाने पांढर्या रंगाच्या मोटारीतून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पथके रवाना झाली. हरयाणातील नहू जिल्ह्यातील ओहोता गावातील आबीद उर्फ लंगडा उर्फ बकरा अब्दुल अली (वय 45) आणि घोडावाली जि.पलवल येथील माहीर लियाकत अली (वय 20) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी इतर पाच साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबुल केले.
त्यांचे दोन साथीदार मध्यप्रदेशच्या पाडला जि. बडवाणी येथील असल्याचे त्यांनी सांगितले. त्याअनुषंगाने तपास पथकाने पाडला गावी जावून ताहीर हुसेन इसरा खान (वय 44) आणि संतोष तुलसीराम जमरे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनीही गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून तीन लाखांची रोकड, 5 लाख रुपये किंमतीचे एच.आर.61 ए.9916 क्रमांकाची मोटार, 50 हजार रुपये किंमतीची एम.पी.09 एम.आर.6252 क्रमांकाची दुचाकी, 10 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, असा 8 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील तीन आरोेपी अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे.