वनविभागाचे अधिकारी सुस्त

Twitter: @maharashtracity

महाड: महाड, पोलादपूर व माणगाव तालुक्यात मुंबई गोवा – राष्ट्रीय महामार्ग (Goa -Mumbai Highway) क्रमांक 66 व अन्य विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगल तोड चालू आहे. तसेच जंगलातून माती उत्खननाचे प्रमाण वाढले असून त्याचा परिणाम वन संपदेवर झाला आहे. तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचा ऱ्हास झाल्याने वन्यप्राण्यांना त्याचा मोठा फटका बसला असून महाड तालुक्यातील रायगड (Raigad) परिसरात वन्य प्राण्यांचा (wild animals) नागरी वस्तीत मुक्त संचार वाढला आहे.

रायगड विभागातील सादोशी गावांमध्ये मागील चार दिवसात पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्याने दोन गाई मृत्यमुखी पडल्या असून दोन नागरिक जखमी झाले आहेत. मात्र, महाड वन विभागाचे (Mahad Forest department) अधिकारी सुस्त झोपी गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

महाड तालुक्यातील पाचाड जवळील सांडोशी गावातील बाळू विठोबा मोहाने व कोंडीराम ढेबे यांच्या पाळीव गाईंवर बिबट्याने हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत बाळू मोहाने यांनी महाड वन विभागाकडे लेखी अर्ज करून मृत झालेल्या गाईच्या मोबदल्यात नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

याबाबत महाड वन विभागाचे वनक्षेत्रपाल राकेश शाहू यांना भ्रमणध्वनी वरून विचारणा केली असता त्यांनी त्याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मागील वर्षी अशाच पद्धतीने बिबट्यांचा मुक्त संचार रायगड विभागात होता. त्यावेळी वनविभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून जनजागृती मोहीम राबविली जात होती.
महाड, पोलादपूर, माणगाव या तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची विकास कामे व फार्म हाउसच्या नावाखाली तसेच निवासी इमारती बांधण्याच्या कामासाठी जंगलतोड (forest cutting) सुरू आहे. त्याचा परिणाम जंगलातील वन्य प्राण्यांवर झाला आहे.

जंगलातील वन्यप्राण्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी असणारे अन्न पूर्णपणे संपुष्टात आले आहे. त्यातच वाढत्या वणव्यांमुळे जंगलातील आश्रयस्थाने पूर्णपणे नष्ट झाल्याने त्यांनी मानवी वस्तीकडे मोर्चा वळवला आहे. महाड, पोलादपूर व माणगाव या तीन तालुक्यात बिबट्यांचा तसेच रानडुकरे, तरस व तत्सम प्राण्यांचा संचार वाढला आहे.

महाड तालुक्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या रायगडवाडी, हिरकणीवाडी, परडीवाडी, नेवाळीवाडी, पाचाड, पुनाडे, करमर, खलई, सांदोशी वारंगी, बावले, कावळे, छत्री निजामपूर, कोंझर या भागासह विन्हेरे विभागातील दक्षिण टोक पांगारी, खरब कोंड, रावतळी, फाळकेवाडी या गावात देखील अधून मधून बिबट्याचे ग्रामस्थांना दर्शन होत आहे.

महाड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश शाहू यांनी याबाबत रायगड विभागातील गावात आपल्या सहकाऱ्यांना घेऊन बिबट्यापासून बचाव होण्यासाठी मागील वर्षी जनजागृती अभियान राबविले होते. ग्रामस्थांना रात्रीच्यावेळी बाहेर पडण्याबाबत काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. या गावातील नागरिकांना बिबट्याला पळून लावण्यासाठी फटाके वाजवणे आवश्यक असून त्यासाठी वनविभागाकडून गावागावात फटाके देण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here