X : @milindmane70
महाडः गेल्या १७ वर्षापासून रखडलेल्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (Mumbai – Goa National Highway) रस्त्याची अठराव्या वर्षीदेखील रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी दुरावस्था झाली आहे. तशात खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी म्हणून पेव्हर ब्लॉकने खड्डे भरण्याची नामी शक्कल राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या संकल्पनेतून राबवली आहे. गणपती आगमनापूर्वी या महामार्गाची पूर्णपणे दुरावस्था होणार असल्याने १५ ऑगस्ट पूर्वी या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास १७ ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा रायगड प्रेस क्लबचे (Raigad Press Club) अध्यक्ष मनोज खांबे यांनी सरकारला दिला आहे.
नागोठणे ते लोणेरेपर्यंत रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात घडल्याचे व वाहने रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, १७ ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी खड्डे असतील, त्या ठिकाणी रायगड प्रेस लबच्या वतीने सरकारचे श्राध्द घालून आंदोलन करणार असल्याचे निवेदन रायगड प्रेस क्लबच्यावतीने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणला दिले असल्याचे मनोज खांबे यांनी सांगितले.
महामार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (National Highway Authority) केला जात आहे. तो दावा अर्धसत्य असून, रायगड जिल्हा हद्दीमध्ये अनेक भागात या महामार्गाचे काम जागोजागी रखडले आहे. तयार झालेला मार्ग नित्कृष्ट दर्जाचा असून या नवीन रस्त्यावर जागोजागी मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत.
दरवर्षी गणपती सण आला की हा महामार्ग खड्ड्यात जातो, त्यामुळे या महामार्गावर जनतेची स्वयंस्फूर्तीने आंदोलने झाली. जनतेची व पत्रकारांची आंदोलन झाल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, खासदारांनी पाहणी दौर्यांचा फार्स करुन थातूरमातूर उपाययोजना करायची, हा पायंडा मागील सतरा वर्षात कायम राहिला आहे. रायगड प्रेस क्लब त्याच प्रमाणे जिल्ह्यातील विविध संघटनांनी वारंवार आंदोलने करुन देखील या रस्त्याची दुर्गती संपण्यास तयार नाही. त्यामुळेच येत्या १७ ऑगस्ट रोजी महामार्गावर खड्डे पडलेत त्या ठिकाणी सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन छेडण्याचा निर्णय रायगड प्रेस क्लबने घेतला आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होईल आणि त्याची सर्व जबाबदारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागावर आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांवर तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांवर राहिल, असा इशारा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे, सचिव अनिल मोरे यांनी दिला आहे.
या निवेदनाची प्रत केंद्रिय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनाही पाठविण्यात आले असल्याचे मनोज खांबे यांनी सांगितले.