X : @milindmane70

महाड

महाड (Mahad) तालुक्यात जानेवारी महिन्यापासूनच मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यास परवानगी दिल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड (tree cutting) झाली आहे. त्यामानाने वृक्ष लागवडीकडे लक्ष देण्यास वन खात्याच्या महाड कार्यालयाला अपयश आल्याचे चित्र तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यापासून (Raigad fort) थेट शिवथरघळपर्यंत आणि वरंध घाट व विन्हेरे विभाग, खाडीपट्टा, वहूर, दासगाव या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर जानेवारी महिन्यापासून ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड (tree cutting) केली आहे. महाड वन विभागाकडून वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदारांना ज्या ठिकाणी वृक्षतोड करायचे आहे, तेथील परवाना दिला जातो. मात्र दिलेल्या परवानापेक्षा अधिक वृक्षतोड केली जात आहे. खाजगी जमिनीतून वृक्ष तोडून ते परवाना दिलेल्या मालकीमध्ये आणून टाकायचे व पुरावा नष्ट करायचा हा गोरख धंदा मोठ्या प्रमाणावर विन्हेरे विभागात मागील चार महिने खुलेआमपणे जंगल ठेकेदार करीत आहेत. त्यांना अभय देण्याचे काम वन खात्याकडून झाल्याने मागील अनेक  वर्षातील वृक्षतोड एकट्या विन्हेरे विभागात बेकायदेशीररित्या झाल्याची चर्चा या परिसरातील ग्रामस्थांकडून ऐकण्यास मिळत आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खाजगी मालकीची झाडे जळाऊ लाकडांसाठी तोड करण्याच्या उद्देशाने खाजगी जंगल ठेकेदार अल्प मोबदल्यात शेतकऱ्यांकडून विकत घेतात. मग हे जंगल ठेकेदार परवाना असलेल्या वृक्षतोडीच्या लाकडांमध्ये समाविष्ट करतात. मात्र याबाबत पूर्ण कल्पना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांना असतानाही आजपर्यंत चालू वर्षात एकाही अनधिकृत वृक्षतोडवर अशी कारवाई वन विभागाकडून झालेली नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) राजधानी असणाऱ्या रायगड विभागात एक शेतकरी स्वयंपाकासाठी जंगलात पडलेली सुकी लाकडे पिकअप व्हॅनमधून घरी घेऊन जात होता. त्यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर कोळसा वाहतूक करीत असल्याचा गुन्हा दाखल करून त्या शेतकऱ्याची मालवाहू पीकअप व्हॅन नाहक अडकवून ठेवण्याचा प्रकार केला. वास्तविक या गुन्ह्यात पंचनामा केला, त्यावेळेला घरच्या इंधनासाठी जळाऊ लाकडे असल्याचे सांगूनही कोळसा वाहतूक करतो असा गुन्हा दाखल करण्याचा प्रताप महाडच्या वनाधिकाऱ्यांनी केला आहे.

खैर व सागवानी लाकडाची मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड? 

महाड वनविभागाकडून (Mahad forest) जळाऊ लाकडाच्या (किटा) वृक्षतोडीसाठी वन विभागाकडून परवानगी देण्यात आली. मात्र या परवानगीच्या नावाखाली अनेक जंगल तस्करांनी महाड तालुक्यात खैर व सागवानी वृक्षांची अवैधपणे वृक्षतोड केली. त्याची गणती करता येणार नाही एवढी संख्या असल्याचे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर खैराची तस्करी होत असताना वनविभागाचे अधिकारी सुस्त झोपी गेले आहेत.

महाड तालुक्यातून खैराच्या वृक्षांची तोड केल्यानंतर ही खैराची लाकडे रत्नागिरी जिल्ह्यातील महाड तालुक्याला लागून असणाऱ्या खेड येथील कात फॅक्टरी दिली जातात, ती छोट्या पिकअप रिक्षातून व मालवाहू पिकअप व्हॅनमधून रात्री बारा वाजेनंतर पहाटे पाच वाजेपर्यंत त्याची वाहतूक होते. याची कल्पना वन खात्याचे अधिकाऱ्यांना असताना चालू वर्षात किती खैर तस्करांवर कारवाई केली हा प्रश्न अनुत्तरीत राहत आहे. एकंदरीत आंधळं दळतंय, कुत्र पीठ खातंय, असा वनविभागाचा कारभार आहे. जेवढ्या प्रमाणात वृक्षतोडीला परवानगी दिली आहे, त्या प्रमाणात तरी वृक्ष लागवड (tree plantation) करण्याचे सौजन्य महाड वन विभागाकडून होत नाही, केवळ कागदोपत्री वृक्ष लागवड केल्याचे पावसाळ्यानंतर दाखवण्यात येईल, असे वनविभागातल्या कर्मचाऱ्यांकडून खाजगीत चर्चिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here