By Milind Mane

Twitter: @milindmane70

महाड: मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर महाडजवळील नव्याने बांधण्यात आलेल्या सावित्री पुलावरील लोखंडी चॅनेल पुलाच्या मध्यभागी तुटल्याने या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग खाते सुस्त झोपी गेले असून पुन्हा एकदा सावित्री पुलावरून दुर्घटना घडण्याची वाट बघत आहे का? असा सवाल असंख्य वाहन चालक शासनास विचारत आहेत.

या महामार्गावरील जुना पूल सात वर्षांपूर्वी दोन ऑगस्ट 2016 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळून झालेल्या अपघातात मुंबईला जाणाऱ्या दोन एसटी बस, एक तवेरा गाडी पुलावरून वाहून जाऊन एसटी बसमधील 29 जण मृत्युमुखी पडले होते. ही घटना महाडकरांना व कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अजूनही आठवते. त्यामुळे या पुलावरून जाणाऱ्या – येणाऱ्या असंख्य प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची चर्चा वाहन चालक करीत आहेत.

महाडजवळील राजेवाडी ते नांगलवाडी या दोन गावाजवळील सावित्री नदीवर पहिला पूल कोसळल्यानंतर दोन नवीन पूल उभारण्यात आले. केवळ पाच वर्षातच या पुलाची दुरावस्था झाली आहे. लोखंडी चॅनल तुटल्यामुळे पुलावरून जाताना वाहनांना तसेच पुलाला हादरे बसत आहेत.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग, महाड येथील कर्मचारी कोणतीही दखल घेत नसल्याने मोठा अपघात झाल्यानंतर अधिकारी झोपेतून जागे होणार आहेत का? असा सवाल या परिसरातील ग्रामस्थ विचारत आहेत. दोन दिवसात डागडुजी करून या पुलावरील लोखंडी चॅनल पूर्ववत करू, असे राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या खात्याचे अधिकारी युद्ध पातळीवर काम तयार नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here