शांदोशी-बावळे-निजामपूर-आमडोशी ग्रामस्थांचा निर्धार

काळ जलविद्युत प्रकल्पाचे अनाधिकृत काम थांबवा?

By Milind Mane

Twitter : @milindmane70

महाड: महाड तालुक्यातील सादोशी, बावळे, निजामपूर, आमडोशी या परिसरातील ग्रामस्थांच्या जमिनी मागील 25 वर्षापासून काळ जलविद्युत प्रकल्पासाठी शासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या जमिनीवर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याआधी धरणाचे काम सुरू केल्याने ते थांबवण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करूनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्याच्या निषेधार्थ अखेर ग्रामस्थांनी 19 फेब्रुवारी, शिवजयंतीच्या दिवशी धरणाच्या बुडीत क्षेत्रात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिल आहे. या संदर्भात महाड प्रांत कार्यालयाला निवेदन देण्यात आले असून प्रशासनात खळबळ उडाली आहे.

सन 2011 पासून काळ जलविद्युत प्रकल्पाच्या (Kal Hydro Electric Power Plant) कामात भ्रष्टाचार झाल्याने व शासनामार्फत तसेच न्यायालयीन प्रक्रियेत या धरणाची चौकशी सुरू असल्यामुळे या धरणाचे काम बंद पडले होते. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काळ जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी धरणग्रस्त ग्रामस्थांचे पुनर्वसन होणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता धरणाचे काम सुरू करण्यात आले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना आणि शासनाची परवानगी नसताना ठेकेदाराने (contractor) मागील वर्षी बेकायदेशीररित्या या धरणाचे काम चालू केले. मात्र ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते.

या धरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने मागील वर्षाची पुनरावृत्ती चालवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ठेकेदाराने धरणाच्या कामासाठी माती उत्खनन करून अनेक शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. ग्रामस्थानी काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला असता ठेकेदाराने गुंडशाहीच्या प्रवृत्तीवर हे काम चालू ठेवले आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रांताधिकारी महाड, काळ जलविद्युत प्रकल्प, कार्यकारी अभियंता, कोलाड तसेच रायगड जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन देखील प्रशासन कोणतीही कार्यवाही करण्याच्या मनस्थितीत नसल्याने बुडीत क्षेत्रातील ग्रामस्थांनी अखेर धरणात बुडून मरण्यापेक्षा धरणाच्या बुडीत क्षेत्रात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी काळ जलविद्युत प्रकल्पाच्या धरणाच्या बुडीत क्षेत्रात सामूहिकरित्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आधी धरणाचे बेकायदेशीररित्या सुरू असलेले काम थांबवा, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण करा, मगच धरणाचे काम चालू करा, अशी मागणी या चार गावातील नागरिकांनी निवेदनाद्वारे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. महाड प्रांताधिकारी कार्यालय यांच्याकडे गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी निवेदन दिल्यावर प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले असून यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. प्रशासन कोणती कारवाई करते त्यावर धरणग्रस्त गावातील नागरिकांची आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

याबाबत रायगड पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्रीमती राज भोज यांना विचारणा केली असता, तुमचे म्हणणे मला लेखी स्वरूपात ईमेल द्वारे पाठवा, ते वाचल्यानंतरच मी तुम्हाला उत्तर देईन, अशी भाषा वापरून त्यांनी आपण किती कर्तव्यदक्ष आहेत याचा नमूना सादर केला आहे, असा आरोप ग्रामस्थानी केला आहे.
end’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here