Twitter: @maharashtracity
महाड: महाड शहरातून गोळा होणारा हजारो टन कचरा दररोज महाड शहरातून लाडवली येथील. घनकचरा निर्मूलन डेपो येथे नेला जातो. मात्र आज सकाळी परिसरात लागलेल्या प्रचंड वनव्यामुळे बाजूला असलेल्या डेपोतील कचरा पेटून आग लागली.
महाड नगर परिषदेच्या लाडवली येथील घनकचरा निर्मूलन प्रकल्पाला शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी आग लागण्याची घटना घडली. या आगीत प्रकल्पातील बिलिंग आणि स्क्रिमिंग मशीनचे काही प्रमाणात नुकसान झाले असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
आगीची माहिती मिळताच महाड अग्निशमन दलाचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी हजर झाले. त्यांनी केलेल्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
यावेळी महाड अग्निशमन दलातर्फे गोविंद साळुंखे, गणेश पाटील, शेखर भोसले, श्रीकांत साळुंखे, पवन कर्जावकर, अनिकेत तांबडे, विशाल केदारे यांनी तत्परता दाखवून आग विझवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
यासंदर्भात महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आजूबाजूला लागलेला वणवा वाऱ्याने पसरत आल्यामुळे प्रकल्पातील सुक्या कचऱ्याने पेट घेतल्याने ही आग लागली असल्याचे सांगितले.