X: @milindmane70
महाड: कोरोनाचा प्रादुर्भाव जगात आणि देशातील काही भागात पुन्हा एकदा डोके वर काढत असून केंद्र आणि राज्य प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. यामुळे कोरोनाची पुन्हा एकदा धास्ती निर्माण झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कोरोनाबाबत प्रसार माध्यमांमध्ये व सोशल मीडियावर बातम्या येऊ लागताच नागरिकांनी गमतीशीर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरवात केल्या आहेत. निवडणुका जवळ येताच कोरोना जागा कसा होतो? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
थंडीचा मौसम सुरु झाला आहे. संपूर्ण राज्यात सर्दी, ताप, खोकला अशा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळत आहे. राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणमध्येच थंडीचा प्रकोप व दररोज बदलणारे वातावरण, त्यानंतर मात्र सततच्या वातावरण बदलाचा परिणाम मानवी जीवनावर कमी – अधिक प्रमाणात दिसून येत होता. मात्र काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याच्या चर्चांना प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर वेग आला आहे.
सिंगापूर पाठोपाठ जगभरात विविध ठिकाणी कमी – अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येवू लागले आहेत. भारतात केरळमध्ये याची संख्या अधिक आहे. तर राज्यात देखील कोरोनाचे रुग्ण काही दिसू लागल्यानंतर आरोग्य यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार सिंगापूरमध्ये हि आकडेवारी मोठी आहे. यामुळे वाढत्या कोरोना संक्रमणाची धास्ती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.
कोरोना संक्रमणाला घाबरून न जाता नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि योग्यवेळी उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.
सन २०२० पासून संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला होता. महाराष्ट्रात देखील याचा मोठा प्रमाणात प्रादुर्भाव जाणवला. संचारबंदी आणि विकसित झालेले लसीकरण यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. मात्र तोपर्यंत लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. कोरोनाची धास्ती आजही लोकांच्या मनातून गेलेली नाही. कोरोना पूर्णपणे नष्ट झाला नसल्याने संपूर्ण राज्यात आजही कोरोनाचे कमी अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.
मागील काही काही दिवसांपासून राज्यातील वातावरण बदलाचा परिणाम मानवी जीवनावर दिसून आल्याने सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला, अशा प्रकारचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. कोरोनामध्ये देखील हीच लक्षणे असल्याने गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाची साथ येण्याची चर्चा वेगाने सुरू झाली आहे. कोरोना सेंटर आणि इतर उपाययोजना आज अस्तित्वात नाहीत तर काही ठिकाणी विस्कळीत झाले आहेत. या उपायोजना तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा कार्यरत करून करुन रुग्णांवर उपचार शक्य आहे. सध्या तरी अशा प्रकारच्या रुग्णांना घरामध्ये विलगीकरण आणि उपचार दिले जात आहेत.
महाड तालुक्यात ९५ टक्केहून अधिक लसीकरण झाले आहे. सध्याची कोरोनाची स्थिती भीतीदायक नसली तरी योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात येत आहे.
निवडणुक येताच कोरोना कसा जागा होतो?
कोरोनामुळे लाखो कुटुंब उध्वस्थ झाली आहेत. ज्यांनी हे चटके सोसले आहेत त्यांच्या अंगावर आजही काटा उभा राहतो. कोरोनामुळे अनेक व्यवसाय, नोकऱ्या अडचणीत आल्या आहेत. कोरोनाच्या बातम्यांनी नागरिक मात्र गमतीशीर प्रश्नांची चर्चा करत आहेत. आता नको कोरोना असे म्हणत निवडणुका आल्या कि कोरोना जागा कसा होतो असा प्रश्न विचारत आहेत.
जानेवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यात पारंपारिक यात्रा महोत्सव व पारंपारिक सणाला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे फेब्रुवारीपासून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने नेमक्या या काळातच कोरोनाला जाग कशी येते? असा प्रश्न सर्वसामान्य मजुरांपासून भाजीपाल्याची हातगाडी व वडापाव विक्रेता ते हॉटेलमध्ये काम करणारा मजूर व कंपनीमधील कामगार ते शाळेतील शिक्षकांपासून सर्वसामान्य गोरगरिबांच्या रुग्णसेविका चालवणाऱ्या चालकांना पडला आहे.